अहमदनगर दि. ११ जानेवारी (प्रतिनिधी ):- मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हयातील बारा मतदार संघामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम व व्हिव्हीपॅट मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनदवारे सुद्धा जनजागृती करण्यात येत असुन जिल्ह्यातील मतदारांनी ईव्हीएम व व्हिव्हीपॅट मशिन्सबाबत माहिती जाणून घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ईव्हीएम व व्हिव्हीपॅट बाबत १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनमध्ये एक अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस नियुक्त करण्यात आले असुन या व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ३ हजार ७३१ मतदान केंद्रापैकी १ हजार ३९८ मतदान केंद्रावर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले असुन जिल्ह्यातील १२ मतदार संघातील १४ तहसिल कार्यालयात ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. मतदारांनी ईव्हीएम व व्हिव्हीपॅट बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.