हजारो व्यक्तींशी संबंध जुळलेले उद्धव शिंदे हे ‘श्रीमंत’व्यक्ती : गुंड बालघर प्रकल्पाच्या वतीने सत्कार

अहमदनगर दि.१० डिसेंबर (प्रतिनिधी) – स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून उद्धव शिंदे हे सामाजिक कार्य करत आहेत. विविध क्षेत्रात सतत कार्यरत असल्याने त्यांचे हजारो व्यक्तींशी संबंध जुळलेले आहेत. त्यामुळे शिंदे हे ‘श्रीमंत’व्यक्ती आहेत, असे गौरवोद्गार तपोवन रोडवरील बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड यांनी काढले.
सावित्री ज्योती राज्यस्तरीय पुरस्कार व महात्मा फुले समता पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा बालघर प्रकल्पाच्या वतीने गुंड यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अभिनव बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका सरला राळेभात, संजय लोखंडे, आशिष अहिरे व सर्व विधार्थी उपस्थित होते.
गुंड म्हणाले, शिंदे यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली. त्यांनी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसह रस्त्यावर थंडीत झोपणाऱ्या नागरिकांना मदत केली. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कामगारारांना टोप्या, तर ज्येष्ठांना छत्र्या दिल्या.
सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, निस्वार्थ भावनेने सामाजिक काम केले. या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार मिळाला. सध्या पुरस्कार अनेकांना मिळतात. परंतु मला मिळालेला हा पुरस्कार कोणताही स्वार्थ न ठेवता केलेल्या कामाचे फळ आहे. या पुढेही कोणत्याही पुरस्काराचे अपेक्षा न ठेवता काम करत राहील अशी ग्वाही उद्धव शिंदे यांनी यावेळी दिली.