पुरस्कार- सन्मान उत्तम आणि आदर्श लोकाभिमुख कार्याची पावती – प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले

कर्जत प्रतिनिधी : दि २
प्रशासन सेवा काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी शासनाने दिलेली जबाबदारी योग्य पार पाडली तर त्यासेवेत समाधान मिळते. आणि त्या सेवेच्या आधारेच तो अधिकारी-कर्मचारी पुरस्काराने सन्मानित होतो. तो सन्मान त्याच्या उत्तम आणि आदर्श कार्याची पावती ठरते असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले. ते कर्जत तहसील कार्यालयात महसूल अधिकारी-कर्मचारी गुणगौरव सोहळ्यानिम्मित बोलत होते. याप्रसंगी कर्जत महसुल उपविभागातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी थोरबोले म्हणाले की, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय ठेवत योग्य ती दिलेली जबाबदारी पार पाडल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना निश्चित होतो. यासाठी सर्वांचे योगदान महत्वपुर्ण आहे. कोरोना काळात प्रशासनास नागरिकांनी दिलेली साथ मोलाची ठरली आणि आपण त्यावर मात केली. मागील वर्षांपासून सर्वच प्रशासकीय विभागाने लोकाभिमुख कार्य करीत जनतेच्या पसंतीस उतरले आहे. जनतेचे समाधान हा प्रशासनाचा अविभाज्य भाग आहे. त्यासाठी प्रत्येकाने तत्पर राहावे. आणि आपले प्रशासकीय काम चोख बाजवावे असे म्हणत गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आणखी जोमाने काम करावे. ज्यांना मिळाला नाही त्यांनी खचून न जाता पुरस्कार प्राप्त असणाऱ्यांना कडून आदर्श घेत मनात जिद्द ठेवून आपले काम पुढे नेत पुढील वेळी मी पुरस्कार घेणारच असा ठाम निश्चय करावा.
यावेळी कर्जत महसूल उपविभागातील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, वाहनचालक, मदतनीस आदींचा प्रशस्तीपत्रक देत सन्मान करण्यात आला. यासह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयात कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना “उत्कृष्ट तहसीलदार” आणि अव्वल कारकून किशोरी त्र्यंबके यांना “उत्कृष्ट कर्मचारी” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा कर्जत महसूल उपविभाग आणि तालुका प्रशासनाकडून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, मनोज भोसेकर, शिरस्तेदार मच्छिंद्र पाडळे यांच्यासह कर्जत-जामखेड महसूल विभागातील महसूल अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी केले तर आभार मनोज भोसेकर यांनी मानले.
********* सर्व प्रमुख विभागाने समन्वय राखल्यास लोकाभिमुख कार्य पार पडते – पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव
सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी एकत्र येत एकदिलाने काम केल्यास ते काम सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरते. प्रशासनात काम करताना समन्वय ठेवल्यास ते काम चोख पार पडते. आणि त्या कामाचे खरे समाधाना त्यास मिळत असते. याच लोकाभिमुख कार्याची जनता आणि वरिष्ठ अधिकारी कायम दखल घेत असतात. आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन.
२) पुरस्काराने जबाबदारी वाढते – गटविकास अधिकारी अमोल जाधव
प्रशासनात काम करताना पुरस्कार मिळणे आनंद-दायक ठरते. मात्र त्या बरोबर त्या पुरस्काराने त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याची आणखी मोठी जबाबदारी वाढते. प्रशासकीय काम करताना हा आनंद त्यास प्रेरणा देणारे ठरते. आणि हीच प्रेरणा भविष्यात त्या व्यक्तीस आदर्श बनवते.