काँग्रेस करणार शहर दुर्दशेचे “भकासपर्व” पुस्तक प्रकाशित – जिल्हाध्यक्ष किरण काळेंची घोषणा!
बरे झाले "त्या" खटल्यात "त्यांना" सरकारी वकील नाही नेमले गेले, काँग्रेसने साधला निशाणा

अहमदनगर दि. १४ जून (प्रतिनिधी ): शहराच्या आमदारांच्या कारकिर्दीला नुकतीच जवळपास ८ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यानिमित्ताने त्यांनी शहराच्या केलेल्या विकासावर आधारित विकासाचे “संग्रामपर्व” या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. त्याची चर्चा थांबते ना थांबते तोच काँग्रेसच्या वतीने मागील ८ वर्षांमधील वास्तव मांडणाऱ्या शहराच्या दुर्दशेचे “भकासपर्व” या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. हे पुस्तक डिजिटल स्वरूपात असणार असुन नगरकरांच्या प्रतिक्रियांसह असणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसच्या या घोषणेमुळे शहराचा ८ वर्षात झालेला विकास खरा की खोटा यावरून नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच किरण काळे युथ फाउंडेशन आयोजित काँग्रेस पुरस्कृत छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा भव्य इव्हेंट पार पडला. यावेळी काँग्रेसच्या दोन बड्या मंत्र्यांची विशेष उपस्थिती होती. या भव्य इव्हेंटनंतर शहराच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक प्रकाशनाचा भव्य इव्हेंट पार पडला. त्यानंतर काँग्रेसने आता “भकासपर्व” पुस्तक प्रकाशनाच्या इव्हेंटची घोषणा केल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण मात्र ढवळून निघत आहे.
काळे म्हणाले की, नगर एमआयडिसीच्या दुरावस्थेमुळे शहरात तरुणांमध्ये असणारी बेरोजगारी, राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या शहराच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या राजकीय हस्तक्षेपामुळे विस्कळीत झालेली बाजारपेठ, खड्ड्यांमध्ये हरवलेले रस्ते, शहराच्या अनेक भागांमध्ये स्ट्रीटलाईट अभावी पसरलेला अंधार, अनेक भागांमध्ये आजही आठ – आठ दिवस नळाला न येणारे पिण्याचे पाणी, या आणि अशा असंख्य नागरी समस्यांमुळे नगरकरांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. नगरकरांच्या समस्यांवर काँग्रेसचे हे पुस्तक प्रकाश टाकणार आहे.
काळे म्हणाले की, नगरकरांच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. शहराच्या नागरी सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठवणारा विरोधी पक्षनेता मनपाला राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षाचाच नगरसेवक विरोधी पक्षनेता असणारी अहमदनगर ही देशातली एकमेव मनपा आहे. त्यामुळे नगरकरांच्या समस्यांवर आवाज उठवायचा कोणी हा प्रश्न आहे. मात्र काँग्रेसची बांधिलकी ही सामान्य नगरकरांच्या प्रति असून काँग्रेस हाच सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला खरा विरोधी पक्षनेता असल्याचे म्हणत “भकासपर्व” पुस्तकाच्या माध्यमातून शहर दुर्दशेचे वास्तव काँग्रेस मांडणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
मनपातील आधीची भाजप – राष्ट्रवादी अभद्र युती, त्यानंतर शहरातील भाजप खासदार – राष्ट्रवादी आमदार यांची सहमती एक्सप्रेस आणि त्यानंतर शहरातील महापालिकेतील सध्याचे सत्ता समीकरण यामुळे सर्व पक्ष एकत्र असल्याचे चित्र अनेकदा शहरात पाहायला मिळत असताना याला अपवाद असणाऱ्या काँग्रेस पक्षसंघटनेच्या या पुस्तकातून नेमकी कोण-कोणत्या मुद्द्यांवर तोफ डागली जाणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र काँग्रेसच्या या घोषणेनंतर नगरकरांमध्ये चांगलीच कुजबूज सुरू झाली आहे.
📌 बरे झाले “त्या” खटल्यात “त्यांना” सरकारी वकील नाही नेमले गेले…
*विकासाचे “संग्रामपर्व” पुस्तक प्रकाशनाला नामांकित सरकारी वकील उज्वल निकम यांची विशेष उपस्थिती होती. केडगाव हत्याकांड खटल्यामध्ये उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून🙄 नेमणूक व्हावी अशी अनेक दिवस मागणी होत होती. पण अजमल कसाब, अबू सालेम, कोपर्डी खटला यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा करणाऱ्या निकम यांच्यासारख्या जबाबदार कायदेतज्ञाची कृती पाहता त्यांची केडगाव हत्याकांड खटल्यात नेमणूक झाली नाही हे बरेच झाले, अशी भावना शहरातील सुजाण नागरिक खासगीत व्यक्त करत असल्याचा दावा किरण काळे यांनी केला आहे.
ते म्हणाले की, या कार्यक्रमात निकम यांच्या बाजूला नगरच्या नावाला काळिमा फासणाऱ्या ऐतिहासिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ल्यातील जामिनावर सुटलेले असलेले राष्ट्रवादीचे दोन-दोन माजी आमदार विराजमान झाले होते. तर ज्यांच्या नगरचा न केलेल्या खोट्या विकासाचे संग्रामपर्व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असे शहराचे विद्यमान आरोपी आमदार यांना तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या समक्ष पोलिसांच्या समोर आमदारांच्या गुंडांच्या टोळक्याने पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करत पळवून आणले होते. आशा कार्यक्रमाला उपस्थित राहत ॲड. निकम यांनी महाराष्ट्रातील नकारात्मक अर्थाने बहुचर्चित असणाऱ्या आमदाराचे केलेले कौतुक ही लोकांच्या विश्वासाची व लोकशाहीची थट्टा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.