सोशल मीडियाचा वापर करून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कर्जत पोलिसांचा वॉच

सोशल मीडियाचा वापर करून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कर्जत पोलिसांचा वॉच
कर्जत दि.१८ ( प्रतिनिधी ) सोशल मीडियावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या पोस्ट, छायाचित्रे यासह आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कर्जत पोलीस विभागाचे लक्ष राहणार असून संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असून ते राखण्यासाठी कटीबद्ध असावे असे आवाहन केले आहे.
सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे, घातक शस्त्रे हातात घेऊन वाढदिवस व अन्य कार्यक्रमाचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करणे, राजकीय भावनेतून एकमेकांची बदनामी होईल अशी शिवराळ भाषा वापरणे. तसेच अश्लील फोटो-व्हिडीओ प्रसारित करून बदनामी करणे, सामाजिक भावनेला ठेस पोहचून नागरीकांची माथी भडकावणे, दंगलीस चिथावणी देणे, जातीय तणाव किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे लिखाण करणे, धमक्या व जीवे मारण्याचे सोशल मिडियावर आव्हान देणे अशा गैरप्रकारांमधून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. कसलीही खातरजमा न करता अनेक समाजविघातकी पोस्ट व्हायरल केल्या जातात. मात्र सत्यता पडताळून पाहिल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. यावेळी संबंधितावर गुन्हे दाखल होत त्याचे आर्थिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक नुकसान होते. त्यामुळे भान ठेवून सोशल मिडियाचा वापर करणे आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असून ते सर्वांनी अंगिकारले पाहिजे असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर आपले विचार व्यक्त करताना कुणाची बदनामी होईल अशी विधाने करू नयेत. गट- तट बाजुला ठेऊन सामाजिक सलोख्याची भावना व आदर ठेवावा. कुणीही भरकटून जाऊ नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी यावेळी दिला.