प्रशासकिय

आयुष्याचे ध्येय निश्चित करता यायला हवे- शितल खिंडे

पाथर्डी (प्रतिनिधी) जीवनात खडतर प्रयत्नांना पर्याय नाही, त्याशिवाय यशाची फळे चाखता येत नाहीत. एकदा आलेल्या अपयशाने खचून न जाता वारंवार सातत्याने प्रयत्न करत राहणे हेच यशाचे गमक आहे, असे प्रतिपादन शितल खिंडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाथर्डी यांनी श्री आनंद महाविद्यालयात जागतिक महिला दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जीवनामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याचे ध्येय आपण बालपणापासूनच जोपासले पाहिजे. आपण ठरवलेले ध्येय साध्य करताना समोर आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी धैर्य असावे लागते, त्यावेळी आपले मनोबल खचू न देता प्रयत्नशील राहणे अत्यावश्यक आहे. जागतिक महिला दिन 08 मार्च रोजी का साजरा केला जातो याची ही पार्श्वभूमी त्यांनी विद्यार्थिनीं समोर मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी या वर्षीच्या जागतिक महिला दिनाच्या संकल्पनेबद्दल सांगितले. या वर्षीची संकल्पना ‘शाश्वत भविष्यासाठी आजची लैंगिक समानता’ या अनुषंगाने त्यांनी समाजातील स्त्रियांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. आपल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची संख्या ही लक्षणीय आहे त्यामुळे या विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, सबलीकरण, सक्षमीकरण व स्वरक्षणासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रमांमधून प्रयत्नशील असते असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राध्यापक सूर्यकांत काळोखे सर यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.
या दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये ‘माझी वसुंधरा व वृक्ष संवर्धन मोहीम’ राबविण्यात आली. तसेच महिला सुरक्षा, महिला सबलीकरण या विषयास केंद्रभूत मानून भिंतीपत्रक, पोस्टर घोषवाक्य व निबंध इत्यादी उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
आजच्या या महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापिका अनिता पावसे, मनीषा सानप , अश्विनी थोरात, रूपाली शिंदे आणि डॉ. जयश्री खेडकर यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका डॉ. जयश्री खेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मनीषा सानप यांनी केले व प्राध्यापिका अनिता पावसे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. बथूवेल पगारे, प्रा. सूर्यकांत काळोखे, प्रा. अजिंक्य भोर्डे, प्रा. अरुण बोरुडे व सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे