लोकशाही दिनाचे सोमवारी 7 मार्च रोजी आयोजन

अहमदनगर दि. 02(प्रतिनिधी) – जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 7 मार्च 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह येथे करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कोविड- 19 विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला नव्हता. तरी यापुढील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल.
या लोकशाही दिनास पोलीस, जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी विभागांचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी हजर असतात. तरी संबंधितांनी उपरोक्त नमूद विभागाच्या तक्रारी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात दाखल कराव्यात. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्याबाबत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणा-या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावा. तथापि न्यायप्रविष्ट, राजस्व/अपिल्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. तसेच अर्जा समवेत तालुका लोकशाही दिनी अर्ज सादर केलेली पोहोच व इतर पूरक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तालुकास्तरावरच तक्रारीचे निराकरण झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज देण्याची गरज भासणार नाही व तक्रारीचे निराकरणही लवकरात लवकर होऊन विलंब टळेल. याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे. जनतेने याची नोंद घ्यावी.असे जाहीर आवाहनही प्रसिद्ध पत्रकाद्वारे श्री. निचित यांनी केले आहे.