राजकिय

काहींना अहिल्यानगरचं मालेगाव, भिवंडी करायच आहे काय ?, ठाकरे शिवसेनेचा सवाल दंगली घडविण्या पेक्षा आय लव्ह रोजगार, आय लव्ह शेतकरी कधी करणार ? : किरण काळे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 1 ऑक्टोबर ( प्रतिनिधी) : महायुतीचे सत्ताधारी हे दंगली घडविण्या पेक्षा आय लव्ह रोजगार, आय लव्ह शेतकरी, आय लव्ह डेव्हलपमेंट, आय लव्ह बाजारपेठ, आय लव्ह इंडस्ट्री कधी म्हणणार आहेत ? तशी कृती केव्हा करणार आहेत ? त्यांना अहिल्यानगरचं मालेगाव, भिवंडी करायच आहे काय ?, असा संतप्त सवाल अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
अहिल्यानगर मध्ये सोमवारी घडलेल्या धार्मिक तणावपूर्ण परिस्थितीवर समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काळे यांनी नेटकऱ्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधताना यावर अत्यंत संवेदनशील, मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काळे यांनी म्हटल आहे, अहिल्यानगरकर सुज्ञ आहेत. दहशत, दबाव यापुढे बोलायला त्यांना मर्यादा असल्या तरी ते मूर्ख नाहीत. तमाम नगरकरांना, विशेषत: तरुणाईला माझ आवाहन आहे, आपल्या भवितव्याचा विचार करता चिथावणीखोर, भडकाऊ वक्तव्यांना बळी न पडता आपल्या करिअरकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावे.
नेत्यांची मुलं एसीत, गोरगरिबांची जेलमध्ये: पोलीस कारवाई नंतरच्या परिस्थितीवर भाष्य करताना किरण काळे म्हणाले की, दोन्ही समाजाच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये कोणत्याही आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, राजकीय नेते, पुढारी, पदाधिकारी यांची मुलं नाहीत. नेत्यांची मुलं एसीत आहेत. मात्र गोरगरिबांची, सर्वसामान्यांची तरुण मुलं जेलमध्ये गेली आहेत. ३५० – ४०० कोटींचा रस्ते घोटाळा पुराव्यानिशी काढला म्हणून मी खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात मी तुरुंगवास भोगला आहे. तुरुंग म्हणजे नरक आहे. ढोंगी राजकीय पुढार्‍यांनी तरुणाईला या नरकात ढकलल आहे. राजकीय पुढारी या गरम तव्यावर आपली पोळी मात्र बाहेर भाजून घेत आहेत. दोन्ही समाजाच्या तुरुंगात गेलेल्या तरुणांच्या घरी कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांच्या घरात स्मशान शांतता आहे. यातून समाजाने शहाणे व्हावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.
“ते” मूठभर लोक म्हणजे संपूर्ण समाज नाही :
किरण काळे म्हणाले, दोन्ही समाजातील मूठभर लोकांना हाताशी धरून षडयंत्र रचत एकमेकांविरुद्ध उभ केले जात आहे. हे मूठभर लोक म्हणजे संपूर्ण समाज, अहिल्यानगर नाही. काहींना तथाकथित, ढोंगी, बेगडी अजेंडा राबवत मंत्री होण्याची स्वप्न पडू लागली आहेत. त्यांच्या विकृतीवर आधारित वैयक्तिक राजकीय राक्षसी महत्वकांक्षांशी सामान्य नगरकरांना काहीही देण – घेण नाही. जनतेला विकास हवा आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली तथाकथित दीडशे कोटी रुपयांची कामं सध्या पूर्णत: ठप्प झाली आहेत. या रखडलेल्या कामांमुळे सर्वत्र वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. निकृष्ट कामांमुळे अन्य रस्ते पावसात वाहून गेले आहेत.
“त्यांना” प्रत्येक सात बाऱ्यावर आपलेच नाव पाहिजे :
धार्मिक तणावाच्या दिशाभूल करणाऱ्या वातावरणाच्या आडून ताबेमारी पुन्हा जोमाने सुरू झाली असल्याच्या गंभीर आरोप किरण काळे यांनी केला आहे. त्यांना शहरातील प्रत्येक मोक्याच्या जागेच्या सात बाऱ्यावर आपलेच नाव पाहिजे आहे. या राक्षसी मानसिकतेतून अनेकांच्या मानगुटीवर पाय रोवून शहराचे आका आणि त्यांचे मस्तवाल बोके धुडगूस घालत आहेत. या शहरात सर्व सामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी, उद्योजक यांनी स्वकष्टाने, प्रामाणिकपणे कमवलेल्या पैशातून घेतलेले प्लॉट, जमिनी यांची ताबा गॅंगपासून सुरक्षित राखण करणे हे जिकरीचे झाले आहे. पोलीस बघ्याच्या भूमिकेत आहेत. आपल्या या काळ्या धंद्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्या करिता बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरून काही लोक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी काळे यांनी केला.
गल्ली ते दिल्ली तुम्हीच, तरी हिंदू खतरे मे ? :मनपा प्रशासक तथा आयुक्त तुमचेच. राज्यातील महायुती सरकार तुमचच. देशातील रंगा – बिल्लाच तथाकथित हिंदुत्ववादी सरकार ही तुमचंच. शहर लोकप्रतिनिधी देखील सत्ताधारी पक्षाचाच. गल्ली ते दिल्ली तथाकथित हिंदुत्ववादी सत्तेत असताना देखील अहिल्यानगर मधील तमाम हिंदू मात्र खतरे मे कसे काय असू शकतात ? खरंतर हिंदू खतरे मे नसून लोकप्रतिनिधी खतरे मे आहेत. म्हणून दंगली घडवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला आहे. तथाकथित कार्यसम्राटांनी रचलेल्या या सापळ्याला बळी न पडता विकास, रोजगार, शांतता, सलोखा यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन काळे यांनी ठाकरे शिवसेनेच्या वतीने नगरकरांना केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे