देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 6 जुलै ( प्रतिनिधी) : आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. गुजरातच्या दावणीला बांधलेल्या काही महाराष्ट्र द्रोह्यांनी मराठी माणसाला डीवचण्याचा प्रयत्न केला. मराठी माणूस पेटून उठला. मुंबईत मराठी माणसाचा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा होताच गुजरात धार्जिण्या महायुती सरकारला धडकी भरली. अहिल्यानगर मध्ये देखील ठाकरे शिवसैनिकांनी जीआरची होळी केली. रस्त्यावर उतरत हिंदी सक्तीला विरोध करणारा आक्रोश केला. महाराष्ट्र ही पेटून उठला. महायुती सरकारला हिंदी सक्तीचा जीआर मागे घ्यावा लागला. मराठी एकजुटीचा विजय झाला. तोच विजयोत्सव आज प्रचंड उत्साहात, वाजत, गाजत मुंबईसह महाराष्ट्रात साजरा होत आहे. हीच मराठी माणसाची एकजूट मुंबईपासून अहिल्यानगरसह अगदी गडचिरोली पर्यंत महाराष्ट्र म्हणून एक झालीच पाहिजे. मराठीला जाहीर आव्हान देणारा नगरमध्ये कोणी सुशील केडिया आढळला तर त्याच्या कानाखाली ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक जाळ काढतील, असा सज्जड इशारा ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी दिला आहे.
मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऐतिहासिक, अभूतपूर्व मेळाव्या नंतर काळे यांनी समाजमाध्यम, प्रसार माध्यमांद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. काळे म्हणाले, या आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये पिढ्यान, पिढ्यांपासून मराठी असणाऱ्या माणसांसह जे लोक राजस्थान, पंजाब, केरळ यासह इतर दक्षिण, उत्तर तसेच देशाच्या अन्य भागातून आले आहेत ते सुद्धा उत्तम मराठी बोलतात. आपल्या संस्कृतीत ते मिसळून गेले आहेत. हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, मग तो कोणत्याही धर्माचा असेल परंतु तो देखील मराठीतच बोलतो. कारण तो ही मराठी आहे. पण समाजात काही अपवाद असतातच. तसे अहिल्यानगर मध्ये देखील काही परप्रांतीय आहेत की ज्यांना मराठी बद्दल दुस्वास आहे, असं माझ्या निदर्शनास आला आहे.
जय गुजरात म्हणत त्यांनी लाचारी दाखवली :
काळे पुढे म्हणाले, एखादा हिंदी बोलणारा आपल्यासमोर आला की आपण स्वाभाविकच त्याच्याशी हिंदीत बोलायला सुरुवात करतो. पण तो मराठीत बोलण्याला सुरुवात करत नाही. किंबहुना प्रयत्नही करत नाही. मराठी अस्मितेची जाणीव यांना करून द्यायची वेळ आता आली आहे. ज्यांना ज्यांना इथे राहायचं आहे त्यांना मराठी ही बोलायला शिकावीच लागेल. उद्योगपती सुशील केडियाला मराठी बद्दल जाहीररित्या द्वेष व्यक्त करण्या एवढी हिंमत येथे कुठून ? ही प्रवृत्ती वेळीच रोखली नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी नाही तर हिंदी सक्तीची करण्याचा देखील अजेंडा राज्याचे अनाजीपंत असणारे देवेंद्र फडणवीस, गद्दार सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे राबवतील. जय गुजरात म्हणत यांनी त्यांची लाचारी ही उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. पण ही आक्रमणं परतावून लावण्याची ताकद ही मराठी माणसांमध्ये आहे.
….अन्यथा शिवसैनिक कानाखाली जाळ काढतील:
इथून पुढे अहिल्यानगर मध्ये मराठीला विरोध करणारा, मराठीचा दुराग्रह करणारा कोणी सापडलाच तर त्याच्या कानाखाली अहिल्यानगर ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक जाळ काढतील, असा सज्जड इशारा किरण काळे यांनी दिला आहे.
ठाकरे ब्रँडचा झंझावात अहिल्यानगर मध्ये ही दिसेल :
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी सर्व मतभेद, मनभेद दूर सारून एकत्र येण्याची घेतलेली भूमिका ही तमाम शिवसैनिक व मनसैनिकांना प्रचंड प्रेरणा देणारी, उत्साह वाढविणारी आहे. आगामी काळात ठाकरे ब्रँडचा झंझावात अहिल्यानगर मध्ये देखील तमाम मराठी बांधवांच्या पाठिंब्याने पाहायला मिळेल, असा ठाम विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा