युवा पिढी देशाचा कणा – दिलीप सातपुते
ओंकार सातपुते यांच्या वतीने कुष्ठधाम स्नेहांकुर व सावलीतील मुलांना मिष्टान्न भोजन

नगर दि. ५ मे (प्रतिनिधी)- भारत हा विशाल लोकसंख्येचा व युवकांचे देश आहे. देशातील युवकांनी इतरत्र न भटकता सामाजिक बांधिलकी जपत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात काम करत आपले योगदान दिले पाहिजे. आज युवा पिढी योग्य मार्गदर्शनाअभावी भरकटत चालली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर अनेक युवा नेतृत्व सामाजिक चळवळीतून पुढे येईल. भारताचे भवितव्य हे युवा पिढीवर अवलंबून आहे. आजची युवा पिढी हा देशाचा कणा आहे. ओंकार सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळाने कुष्ठधाम स्नेहांकुर व सावली संस्थेतील वंचित घटकांना बरोबर घेऊन त्यांचा जन्मदिवस साजरा करून समाजात एक चांगला आदर्श समाजामध्ये निर्माण केल्याचे प्रतिपादन शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
कार्यक्रमास माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक दीपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, नितीन सुरसे, गणेश पोळ, विशाल शिरवळे, शिवम शिंदे, वैभव जाधव, तुषार नाणेकर, कृष्णा साळवे, महेश धनगर, सारंग धनगर आदी उपस्थित होते.
माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की, आपण समाजकार्य करताना आपल्या अवतीभवती अनेक वंचित घटक असतात. ते मुख्य प्रवाहापासून काहीसे दुरावलेले असतात. अशांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असते. यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावतात. परंतु आर्थिकतेमुळे त्यांनाही काही मर्यादा येतात. अशा संस्थांना बरोबर घेऊन युवकांनी आपला जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरी केला, तर वंचित घटक आपोआप मुख्य प्रवाहात येतील, असे सांगितले.
ओंकार सातपुते म्हणाले की, आज माझा जन्मदिवस माझ्या मित्रांनी एकत्रित येऊन वंचितांबरोबर साजरा केला, हा दिवस कायम स्मरणात राहील. वंचितांच्या चेहर्यावरील निरागस हास्य व सुखाचे वलय आज मला खूप काही शिकवून गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिर्के यांनी केले, तर आभार विशाल नानेकर यांनी मानले.