कल्याण रोड छत्रपती शिवाजीनगर येथील जि.प.शाळेच्या खोल्या त्वरित बांधण्यात याव्या अन्यथा विद्यार्थी-पालकांसह शिक्षणाधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार – सचिन शिंदे

अहमदनगर दि.२२ जून (प्रतिनिधी) – कल्याण रोडवरील छत्रपती शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे त्वरित बांधकाम करण्यात यावे, अन्यथा विद्यार्थी-पालकांसह शिक्षणाधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशा इशार्याचे निवेदन नगरसेवक सचिन शिंदे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या सहा खोल्या होत्या. शाळेच्या चार खोल्या नादुरूस्त झाल्यामुळे शाळेच्या खोल्या पाडणे बाबत दि. 27/6/2019 रोजी आदेश देण्यात आले. त्यानुसार दिनांक 5/11/2022 रोजी शाळेच्या चार खोल्या पाडण्यात आल्या. वास्तविक पाहता पाडलेल्या खोल्या तातडीने बांधणे आवश्यक असताना अद्याप पर्यत वर्ग खोल्या बांधण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या दोन खोल्यामध्ये 100 ते 125 विदयार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. शासनाने सर्व शिक्षा अभियान राबवून समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांला शिक्षण घेण्याबाबत प्रवृत्त करित आहे. यापूर्वी शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वर्ग खोल्या बांधून मिळणे बाबत मागणी केलेली आहे. उपलब्ध असलेल्या दोन खोल्या याही जुन्या आहेत. सध्या पावसाळयाचे दिवस सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील शाळा खोल्याचे बांधकाम एक महिन्यात न झाल्यास सर्व विद्यार्थी- पालक वर्गासह शिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन म्हणून आपणावर राहील अशा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.