आठवडे बाजारातील भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी कर्जत पोलिसांची ध्वनी प्रक्षेपक यंत्रणा

कर्जत (प्रतिनिधी) : दि ११ जुलै
मागील दोन तीन आठवड्यापासून कर्जतच्या आठवडे बाजारात भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले होते. त्यास अटकाव आणण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आज कर्जतच्या बाजारात ध्वनी प्रक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करीत नागरिकांना आपल्या मौल्यवान दागिने वस्तू, खिशातील रक्कम आणि मोबाईल व्यवस्थित सांभाळावे असे आवाहन केले यासह स्वता बाजारपेठेत फेरफटका मारीत संशयास्पद व्यक्तींना झटका दिला.
सोमवार, दि ११ रोजी शहरातील आठवडे बाजारात ध्वनी प्रक्षेपक यंत्रणेची जोडणी करून बाजारात खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला पोलिसांनी दिलेल्या सुचना ऐकायला मिळत आहेत. ‘मोबाईल वरच्या खिशात न ठेवता तो खालच्या खिशात ठेवावा, आपली पर्स, महागड्या वस्तू सांभाळा. चोरी बाबत संशयास्पद हालचाली आढळल्या तर तात्काळ त्याच ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना कळवा’ अशा अनेक सुचना नागरिकांना ध्वनी प्रक्षेपकावरून दिल्या जात आहेत. या अगोदर अनेक मोबाईल- पर्स चोरांना जेरबंद करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. मात्र एवढे करूनही गर्दीचा फायदा घेऊन संधी साधणाऱ्या चोरट्यांना रोखणे ही कठीण बाब आहे. अनेकवेळा बाजारात भाजी,किराणा किंवा साहित्य विकत घेताना महिला व पुरुष त्या वस्तू आपल्या पिशवीत ठेवण्यासाठी खाली वाकतात.याचाच फायदा घेऊन चोरटे संधी साधतात. चोरटे बाजारातील खरेदीदार नागरिकांच्या शेजारी उभा राहून भाजी घेतल्याचा खोटा बहाणा करतात आणि क्षणात मोबाईल, पर्स व इतर वस्तूंवर डल्ला मारतात. काही वेळात आपल्याला चोरी झाल्याचे समजते मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ‘नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून होणाऱ्या नुकसानीस टाळावे” असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.