सामाजिक

शहरातील राजकीय वरदहस्तातून सुरू असणाऱ्या गुंडगिरीची पायमुळे उखडून टाका, जम्बो सर्वपक्षीय शिष्टमंडळाची एसपींकडे मागणी कोतवली पोलीस स्टेशन म्हणजे राष्ट्रवादी भवन झाल्याचा आरोप

अहमदनगर दि.२९ डिसेंबर (प्रतिनिधी) : हॉकर्स युनियनचे अध्यक्ष संजय झिंजे यांच्यावर राष्ट्रवादीच्या सुरज जाधव आणि टोळीने केलेल्या भ्याड हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून एमपीडी कायद्याअंतर्गत तात्काळ प्रस्ताव करण्यात यावा. मोक्का लावण्यात यावा. शहरात राजकीय वरदहस्थातून सुरू असणाऱ्या गुंडगिरीची पायमुळे पोलिसांनी उखडून टाकावीत. कोतवाली पोलीस स्टेशन म्हणजे राष्ट्रवादी भवन झाले आहे. त्यामुळे सर्रास राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल होत आहेत. या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय जम्बो शिष्टमंडळाने एसपी राकेश ओला यांची समक्ष भेट घेऊन केली आहे.

दरम्यान स्वतः एसपींनी या प्रकरणामध्ये अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती करत असल्याची घोषणा केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक परिसरात जमलेली गर्दी आणि मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेता शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर स्वतः एसपी राकेश ओला हे खाली येऊन त्यांनी जमावाला संबोधित केले. तसेच माध्यमांशी संवाद साधला.

काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय, आम आदमी पार्टी, मनसे, कामगार संघटना, सैनिक पार्टी, राष्ट्रीय किसान पार्टी आदी पुरोगामी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांच्या जम्बो शिष्टमंडाने सुमारे अर्धा ते पाऊण तास जिल्हा पोलीस अधीक्षकां समवेत चर्चा केली. यावेळी अनेक गंभीर आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी शहरातील राजकारणाच्या पाठिंब्याने होणाऱ्या गुन्हेगारीच्या संदर्भात केले.

यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना ठाकरे गटाचे विक्रम राठोड, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, किशोर रागावले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भैरवनाथ वाकळे, आम आदमी पार्टीचे राजेंद्र कर्डिले, मनसेचे सचिन डफळ, नितीन भुसारे, संदीप भांबरकर, अनिता दिघे, काँग्रेसचे मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, गौरव घोरपडे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, नगरसेवक योगीराज गाडे, आम आदमी पार्टीचे प्रा. अशोक डोंगरे, रवी सातपुते, विद्या शिंदे, गणेश माळवदे, भरत खाकाळ, कॉ. अनंत लोखंडे, कॉ. मेहबूब सय्यद, जालिंदर वाल्हेकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. फिरोज चांद शेख, कॉ. सुभाष लांडे, नगरसेवक दत्ता कावरे, दिलीप घुले, राष्ट्रीय किसान पक्षाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीधर दरेकर, शरद मडूर, एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जहागीरदार, ॲड. अभिषेक भगत आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळा :
यावेळी झिंजे तसेच पंजाबी समाजाचे राजू जग्गी यांच्यावर मागील चार दिवसांमध्ये झालेले हल्ले तसेच यापूर्वी देखील व्यापारी, नागरिकांवर ताबा प्रकरणांमधून झालेले हल्ले हे जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील जामीनवरच्या आरोपींनी केले आहेत. त्यामुळे अशा आरोपींच्या याद्या करून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आ. जगताप यांनी मला वाचवले नाही :
कोतवाली पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटी फिर्याद नोंदवली आहे. पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या गडबडीचा गैरफायदा घेत माझी एफआयआर कॉपीवर सही घेतली गेली. यामध्ये आ.संग्राम जगताप यांनी मला मारहाण होत असताना वाचवले असे खोटे नमूद केले गेले. वास्तविक पाहता आ. जगताप यांच्या समोरच मला मारहाण झाली. मला नागरिकांनी मदत केली नसती तर माझा जीव गेला असता. शहराचे लोकप्रतिनिधी असून देखील ते मदतीसाठी पुढे आले नाहीत नाहीत. ही शरमेची बाब असल्याचे फिर्यादी संजय झिंजे यांनी म्हटले आहे. आ.जगताप यांनी मला वाचवले हा केलेला फिर्यादीतील खोटा उल्लेख तात्काळ वगळण्यासंदर्भात कोतवाली पोलिसांना सूचना करण्याची मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राजकीय गुन्हेगारी विरोधात पहिल्यांदाच शहरात वज्रमुठ :
संजय झिंजे, राजू जग्गी मारहाण प्रकरणानंतर शहरात पहिल्यांदाच राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय तसेच पुरोगामी संघटना यांची राजकारण विरहित वज्रमुठ पाहायला मिळाली. शहरातल्या राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण हे शहराला कलंक आहे. यामुळे शहराची बदनामी होत आहे. यातून शहर वाचले पाहिजे, अशी भूमिका या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे