रविवारी आणि सोमवारी संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव, यात्रा कमिटी आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी!

कर्जत (प्रतिनिधी) : दि २३ जुलै कर्जतचे आराध्य दैवत श्री. संत सदगुरू गोदड महाराज यांचा रविवार (दि.२४) कामिका एकादशीला रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने. यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावणार आहेत.
शनिवार, दि.२३ ला रात्री १२ वा.नंतर मंदिरात अभिषेकाला सुरुवात केली जाते. त्यानंतर पहाटे पूजा होऊन दर्शनबारीला सुरुवात होते. दुपारी १२.४५ वा. पंढरीचा राजा श्री. पांडुरंग कर्जत येथे प्रत्यक्ष विराजमान होतात अशी आख्यायिका आहे. तहसीलदारांच्या हस्ते शासकीय पूजा होऊन मूर्ती रथात विराजमान होऊन रथ ग्राम प्रदक्षिणेसाठी निघतो. भाविकभक्त मोठ्या आनंदाने जयघोष करीत दोरखंडाच्या साह्याने रथ ओढतात. ग्रामप्रदक्षिणा करताना दर्शनासाठी अबाल वृद्धांची मोठी गर्दी होते. भाविक रथही ओढतात. रथाच्यापुढे पंचक्रोशितून आलेल्या पायी दिंड्या असतात. कापरेवाडी वेशीजवळ भारुडाचा कार्यक्रम होतो. ग्रामप्रदक्षिणा करीत आरतीने सांगता होते. यासाठी तालुक्यासह महाराष्ट्रातून भाविक हजेरी लावतात. रात्री कीर्तन होते.
दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हगामा भरविला जातो. या वेळी महाराष्ट्रातून नामवंत मल्ल व कुस्तीशौकिन हजेरी लावतात.या रथोत्सवाचे दुसरे आकर्षण म्हणजे मनोरंजनाची मायानगरी. या नगरीत खेळणी, पाळणे, जादूचे प्रयोग, खाऊंची दुकाने यात्रोत्सवाची शोभा वाढवतात.सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने भाविकभक्त पावसासाठी महाराजांना साकडे घालतील. यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या मायानगरीतील लोकांना काही उपद्रवी लोकांकडून त्रास होतो. यासाठी कर्जत पोलिसांनी मायानगरी परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे तर गोदड महाराज मंदिर परिसरात ५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. उपद्रवी लोकांवर गुन्हे दाखल केले जातील. यासाठी काही पथके तैनात करण्यात आली आहे. रथ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी एक पोलीस निरीक्षक, सात सहायक व पोलीस उपनिरीक्षक यासह ७० पोलीस कर्मचारी, ४० पोलीस मित्र आणि एक शीघ्र कृती दल तुकडी तैनात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
******:- यात्रा काळात वाहन पार्कींग व्यवस्था
श्रीगोंदा- वालवड, मिरजगाव रोडसाठी दादा पाटील महाविद्यालयाच्या मागे, कुलधरण – श्रीगोंदा समर्थ विद्यालय आणि शहाजीनगर व बसस्थानक परिसर. राशीन आणि करमाळा रोड मार्केट यार्ड, तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती. मुख्य रस्त्यावर रथ आल्यास पर्यायी वाहतूक व्यवस्था सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूने – शहानगर- छत्रपती शिवाजी महाराज चौक- बसस्थानक – नगर रोडने वळविण्यात आली असल्याची माहिती पोनि यादव यांनी दिली.
2) तब्बल दोन वर्षानंतर रथयात्रा….!
२०२०आणि २०२१या काळात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रथयात्रा भरली नव्हती.परंतु यंदा यात्रा मोठ्या उत्साहात भरली आहे. या पार्श्वभूमीवर मायानगरी ही मोठ्या प्रमाणावर भरली असल्याचे दिसते आहे. यामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.