प्रशासकिय

ग्रामीण भागातील महिला व मुलांच्या मदतीसाठी पोलीस उप अधीक्षक स्तरावर भरोसा सेल उभारा जिल्हयातील प्रत्येक महाविद्यालयात “सेफ कॅम्पस” सुरू करा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

अहमदनगर दि. 24 (प्रतिनिधी):- पीडित महिला व मुलांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर भरोसा सेल कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिला व मुलांच्या मदतीसाठी पोलीस उप अधीक्षक स्तरावर भरोसा सेल उभारण्यात यावेत.तसेच विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी जिल्हयातील प्रत्येक महाविद्यालयात “सेफ कॅम्पस” सुरू करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध विषयांचाआढावा उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
बैठकीस महापौर श्रीमती रोहिणी शेंडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, माजी महापौर भगवान फुलसुंदर, सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलच्या आधारामुळे अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील महिला व मुलांनाही या भरोसा सेलपर्यंत वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक पोलीस उप विभागीय अधिकारी स्तरावर भरोसा सेल कार्यान्वित करण्यात येऊन या सेलच्या माध्यमातून पिडित महिला व बालकांना आधार देण्याचे काम करण्याच्या सुचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.
महाविद्यालयांमधून विद्यार्थींना छेडण्याचे अनेक प्रकार घडतात. अशा प्रसंगी या मुली पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार करण्यास घाबरतात. या मुलींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये “सेफ कँपस” उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. महाविद्यालयातील विद्यार्थीनींचा सहभाग असलेला एक ग्रुप तयार करण्यात येऊन त्यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात यावा.जेणेकरुन मुलींची छेडछाडीबाबत काही तक्रार असल्यास त्या न घाबरता या माध्यमातून मांडू शकणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील 84 वारसांनी मदत मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जापैकी 41 वारसांना मदत देण्यात आली असुन 23 प्रकरणे अपात्र ठरली असुन 20 प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर कार्यवाही करत वारसांना तातडीने मदत देण्यात यावी. तसेच जी प्रकरणे शासन नियमानुसार अपात्र ठरली आहेत अशा कुटूंबियांसोबत संवाद साधून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करण्याच्या सुचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.
कोव्हीडमुळे ज्यांना पती गमवावा लागला अशा एकल महिलांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करा असे निर्देश देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अशा महिलांच्या पतीच्या नावे शेती किंवा व्यवसाय असेल तर पतीच्या जागी वारस म्हणून त्यांचे नाव नोंदविण्यात यावे. या महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. उच्चशिक्षित असणाऱ्या काही महिलाही यात एकल महिला झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न प्रशासनाने करावेत. महिलांसाठी शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनांची माहिती महिलांना मिळावी यासाठी समाधान शिबीरांचे आयोजन करण्याच्या सुचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी विभागामार्फत करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिली.
बैठकीस सर्व सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे