अधिकाऱ्यांनी सांघीकपणे काम करण्याची गरज- न्यायमुर्ती संजय मेहरे श्रीगोंद्यात कायदेविषयक जनजागृती शिबीराची सांगता

अहमदनगर दि.14 (प्रतिनिधी):- सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अनेक शासकीय योजनांबरोबरच समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सामान्यांना घटनेने समान अधिकार दिले आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबरोबरच कायदेविषयक जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधी, न्यायपालिका व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकत्रित व सांघीकपणे काम केल्यास सामान्यांचे जीवन निश्चितपणे सुकर होईल असा विश्वास, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती संजय जी. मेहरे यांनी व्यक्त केला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, तालुका विधी सेवा समिती, श्रीगोंदा व तालुका वकील संघ, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती महाशिबीर आणि कायदेविषयक सबलीकरणासाठी नागरीकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेच्या सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी न्यायमूर्ती संजय मेहरे बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वे. यार्लगड्डा, जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समिती, श्रीगोंदाचे अध्यक्ष मुजीब शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, श्रीगोंदा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दत्तात्रय झराड,आमदार बबनराव पाचपुते, श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे.आदींची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायमूर्ती संजय मेहरे म्हणाले, की, समाजातील सर्वसामान्य आजही अनेक गोष्टीच्या ज्ञानापासून अनभिज्ञ आहेत. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक तालुक्यात विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना केली असून याद्वारे सर्व सामान्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे. जनसेवेची भावना अंगी बाळगत जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन न्यायाधीश कायद्याची माहिती सामान्यांना देत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून ती सार्थपणे पार पाडण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आजची बालके ही उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. ही पिढी सुदृढ तसेच आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी विद्यार्थी दशेतच बालकांना स्वच्छतेची सवय देण्याबरोबरच उत्तम नागरिक होण्यासाठी चांगले संस्कार द्यावेत, असेही न्यायमूर्ती श्री मेहरे यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले की, समाजातील प्रत्येकाला घटनेने समान अधिकार दिले आहे. या अधिकारांची सामान्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमातुन जिल्हाभरात एक चेतना निर्माण करण्याचे काम करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात कायद्याची प्रभावी जनजागृती करण्यात आली असून या कार्यक्रमात सहभागी सर्वांचे त्यांनी आभारही व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यायिक विभाग आणि प्रशासकीय विभाग यांच्या योग्य समन्वयामुळे जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचे असून त्यांनी कायद्याची अंमलबजावणी सक्षमपणे करणे आवश्यक आहे,यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी अगोदर कायद्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले. लोक अदालतीच्या माध्यमातून दीड लाख प्रकरणांपैकी 37 हजार प्रकरणे निकाली निघाली असून यातून शासनाला 90 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे अहमदनगर जिल्हा राज्यात दुसरा क्रमांकाचा जिल्हा ठरला असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुका वकील संघाचे अध्यक्ष, ॲड. दत्तात्रय झराड, आपल्या मनोगतात म्हणाले,कायदेविषयक जनजागृती बाबत श्रीगोंदा तालुक्यातील काम उत्कृष्ट आहे,लोकन्यायालयाच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वकील संघातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले असल्याबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात, कायदेविषयक जनजागृती शिबिराच्या यशस्वीतेबाबत माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विविध उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात शिबीराच्या यशस्वीतेसाठी मदत करणा-या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्रीगोंदा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी आभार व्यक्त केले.
*कायदेविषयक जनजागृती शिबिरातील स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन,विविध स्टॉलला भेट*
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सर्व सामान्यांना माहिती होऊन या योजनांची जनजागृती व्हावी या उद्देशाने श्रीगोंदा येथे आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालय, महावितरण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, नगर पालिका, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, भरोसा सेल, वन विभागासह इतर विभागांच्या स्टॉलचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी या स्टॉलला प्रत्यक्ष भेट देत योजनांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना झालेल्या लाभाची माहिती जाणून घेतली व लाभार्थिंशी संवाद साधला.
*भरोसा सेलमार्फत 10 जोडप्यांचे मनोमिलन*
समाजामध्ये पती-पत्नीमध्ये छोट-छोट्या कारणांमुळे वाद निर्माण होतात. भरोसा सेलच्या माध्यमातून पती-पत्नीमधील हे वाद मिटविण्यात येऊन 10 जोडप्यांचे मनोमिलन करण्यात यश आले असून मान्यवरांच्या उपस्थित या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शिबिरास न्यायपालिकेतील अधिकारी, विधीज्ञ, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.