दिवाळी सुट्टीतच दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचा कालावधी गैरसोयीचा -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी सुट्टीत परीक्षार्थी दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचा काळावधी असल्याने सदरील परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रश्न मांडला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे गोवर्धन पांडुळे, मोरेश्वर देशपांडे, नानासाहेब जोशी, महाजन, सहदेव कर्पे, एस.एम. कुलकर्णी, जी.के. गायकवाड, एन.बी. वायळ, पद्माकर गोसावी, अर्जुन वाळके, भाऊसाहेब शेटे, देविदास लांडगे, गणेश बरकडे, आर.के. खेमनर आदी उपस्थित होते.
दिवाळी सुट्टीतच दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचा काळावधी गैरसोयीचे असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी स्पष्ट केले. शिक्षणाधिकारी कडूस यांनी सदर प्रश्न वरिष्ठस्तरावर संपर्क करुन तातडीने कळविला. माध्यमिक शाळांना नियमित दहावी बोर्डातील विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. त्याची मुदत 19 ऑक्टोबर ते गुरुवार 10 नोव्हेंबर पर्यंतची आहे. परंतु हा संपूर्ण कालावधी दिवाळी सुट्टीचा असल्याने, विद्यार्थी व ही कामे करताना वर्गातील विद्यार्थ्यांच्या नोंदींना जबाबदार असणारा वर्गशिक्षकांनाही दिवाळी सुट्टीत शाळेत यावे लागणार आहे.
त्याबरोबरच या काळात विद्यार्थी उपलब्ध होणे देखील अवघड आहे. शिक्षकेतर कर्मचार्यांना वर्षातून फक्त दिवाळीची सुट्टी लागून रजा मिळते. या सुट्टीत शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत आपल्या मूळ गावी जातात. वर्षातून एकदाच अर्जित रजा खर्ची टाकून सुट्टीचा आनंद घेतात. इयत्ता बारावी बोर्डाच्या विद्यार्थांचे परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ दिलेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रश्नाची दखल घेऊन दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचा काळावधीस मुदतवाढ द्यावी, शेवटच्या तारखेपासून किमान 25 दिवसाचा अधिक कालावधी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.