‘एचआयव्ही बाधित’ रुग्णांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – भाग्यश्री पाटील एचआयव्ही बाधितांसाठी ‘सामाजिक संरक्षण योजना’ या विषयावर शिबिर

अहमदनगर, दि.१२ ऑक्टोंबर( प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयामार्फत एचआयव्ही बाधित रुग्णांना नियमितपणे औषधोपचार दिला जातो. त्यांच्या गरजा ओळखून शासनाकडून योजना राबविल्या जात आहेत. रूग्णांनी स्वत: पुढाकार घेऊन योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी आज येथे केले.
अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी ‘सामाजिक संरक्षण योजना’ या विषयावर आयोजित शिबिराचे उद्घाटन भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, रुग्णालय व्यवस्थापक डॉ. मनोज घुगे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. गीता गवळी, विहान प्रकल्प संचालक प्रशांत येंडे, आरंभ संस्थेचे प्रदीप काकडे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे डॉ. मयूर मुथा, तसेच ॲड. आशिष पोटे, रजनी ताठे, गणेश आगळे, कुमार रंजन, विठ्ठल केनगरकर व श्री राहुल भोसले आदी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.घोगरे म्हणाले, एचआयव्ही बाधित रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे.
छाती व गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल माहिती व उपचाराविषयी डॉ. पद्मजा गरुड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या शिबिरात अहमदनगर तहसील, महात्मा फुले जन आरोग्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , संजय गांधी निराधार योजना, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अहमदनगर पंचायत समिती व बँक ऑफ बडोदा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एचआयव्ही बाधितांना योजनांची माहिती दिली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी विजय राऊत, रणधीर भिसे, गणेश गोत्राल, प्रवीण देठे, राधाकिशन पाटोळे, संजय कुताल, राकेश गोहर, विहान संस्थेचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्य महाविद्यालयांचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम आधिकारी शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ लोखंडे यांनी केले तर आभार श्रीमती भक्ती यांनी मानले.