राजकिय

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय रेल्वे माल धक्क्यावरील ठेकेदारांच्या दावणीला – किरण काळे दरवाढ आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास मंगळवारपासून कामगारांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

अहमदनगर दि. ९ मार्च (प्रतिनिधी) : कामगारांच्या हिताचे रक्षण करणे ही सहाय्यक कामगार आयुक्त तथा तथा माथाडी मंडळ अध्यक्ष कार्यालयाची जबाबदारी आहे. रेल्वे माल धक्क्यावरील दरवाढी संदर्भात ठेकेदार (हुंडेकरी) व कामगार यांच्यात एकमत होत नसल्या कारणाने माथाडी मंडळाने आदेश पारित केला होता. कामगारांनी मंडळाने आदेश मान्य असल्याचे लेखी कबूल केले आहे. तरीही दरवाढ दिली जात नाही. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय रेल्वे माल धक्क्यावरील ठेकेदारांच्या दावणीला बांधले गेले असल्यामुळेच कामगारांना न्याय मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केला आहे.

दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. ती तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी कामगारांचे शिष्टमंडळ सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी कामगारांनी काळे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत आम्हाला कोणीच वाली उरलेला नाही. ज्या कामगार पुढाऱ्यांवर, राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवतो, त्यांच्यासमोर आमच्या व्यथा मांडतो, तेच आमच्या नावाने ठेकेदार आणि अधिकाऱ्यांशी मांडवली करून मोकळे होतात. सेटलमेंट करतात. त्यामुळे तुम्हीच आता इथे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारून कामगारांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी काळे यांच्याकडे कामगार बांधवांनी केली होती.
काळे तातडीने कामगार कार्यालयात पोहोचले. कामगारांचे सविस्तर म्हणले त्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी सहाय्यक आयुक्तांना चांगलेच धारेवर धरत प्रश्नांचा पाढाच वाचला. यावेळी त्यांची भांबेरी उडाली. निरुत्तर झाल्यामुळे त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. हुंडेकरी व वाहतूक संघटनेला पारित केलेला आदेश मान्य नसल्या कारणाने त्यांनी आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी मे. उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

परंतु मे. उच्च न्यायालयाने हुंडेकरी व वाहतूक संघटनेला स्थगिती दिलेली नाही. नंतर कामगारांच्या वतीने मुकादम विलास उबाळे यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मंडळाचे म्हणणे मांडण्यास सांगितले असता मंडळाच्या अध्यक्षांनी आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने कामगारांच्या वतीने दाखल केलेले प्रकरण निकाली काढले आहे.
काळे म्हणाले की, याला मोठा कालावधी उलटूनही अद्यापही मंडळाने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. मंडळाकडे वारंवार कामगारांनी लेखी तसेच तोंडी स्वरूपात याबाबत विचारणा केली असता मंडळाकडून नेहमीच टाळाटाळीचे व वेळ काढूपणाचे उत्तर देण्यात आले आहेत. ठेकेदार, अधिकारी यांच्यात संगनमत असल्याने हा प्रकार सुरू आहे. माथाडी मंडळ हे माथाडी कामगारांसाठी काम करत नसून ठेकेदार, सेटलमेंट करणारे कामगार पुढारी, राजकीय नेत्यांच्या संघटना यांच्यासाठी काम करत आहे. मात्र इथून पुढे आता हे खपवून घेतले जाणार नाही. मी आणि काँग्रेस कामगारांच्या पाठीशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन यावेळी काळे यांनी कामगारांना दिले.
अन्यथा मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा :
यावेळी कामगारांच्या वतीने कामगार प्रतिनिधी सुनील भिंगारदिवे, दिपक काकडे, गौतम सैंदाने, भारत सरोदे, अमर डाके यांनी निवेदनाची दखल घेत सहाय्यक कामगार कार्यालयाने अंमलबजावणी न केल्यास मंगळवार (दि. १४) पासून रेल्वे माल धक्क्यावरील कामगार बेमुदत धरणे आंदोलन पुकारतील असा इशारा दिला आहे. वेळप्रसंगी माल धक्क्यावरील सर्व कामगार आंदोलनात सहभागी होत कामकाज ठप्प करतील. यामुळे काही कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सहाय्यक कामगार कार्यालय व माथाडी मंडळावर राहील. या पत्राची प्रत कामगारांनी पोलिसांना देखील दिली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे