स्टार्टअप यात्रेच्या द्वितीय टप्प्यात १३ ऑक्टोंबर रोजी प्रशिक्षण व सादरीकरण सत्राचे आयोजन

अहमदनगर, ४ ऑक्टोंबर (प्रतिनिधी)–कौशल्य रोजगार उद्योजकता व नविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण व सादरीकरण सत्राचे आयोजन १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरूडगाव रोड, अहमदनगर येथे करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त नि.ना.सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
नावीन्य, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कोठेही यशस्वी होऊ शकतात. नवसंकल्पनांना योग्य पाठबळ मिळणे आवश्यक असते. त्यामुळे अहमदनगर जिल्हयातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा पहिला टप्पा १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये पार पडला. या सत्रांमध्ये नवउद्योजकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
द्वितीय टप्प्यातील या प्रशिक्षण शिबिरातील प्रथम सत्रात शासनाच्या विविध योजनांची माहिती, स्थानिक उद्योजकांचे व्याख्याने, सादरीकरण तयार करणे इत्यादी बाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. व्दितीय सत्रात सहभागी नवउद्योजकांना स्टार्टअप परीसंस्थेतील तज्ज्ञासमोर आपल्या कल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल. सादरीकरणानंतर जिल्हयातील उत्कृष्ट स्टार्टअप / नवकल्पनांची तज्ज्ञामार्फत निवड करून पारितोषिके देण्यात येतील. तसेच नवउद्योजकांना बीज भांडवल, नाविन्यता परीसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ज्ञ व्यक्तींचे नवकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळेल.
नवउद्योजकांनी स्टार्टअप यात्रेमधील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी mahastartupyatra.in / www.msins.in या लिंकवर नोंदणी करावी. १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथे नोंदणी अर्ज, मॉडेल/प्रोटोटाईप (असल्यास) व इतर आवश्यक दस्तावेजासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा ९८२२१८१११४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री.सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.