राष्ट्रीय पुरस्कार मिळवत कुंकूमार्चनने नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला – किरण काळे शहर जिल्हा काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने कुंकूमार्चन टीमचा केला गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. उत्तमोत्तम, दर्जेदार कलाकार या मातीने देशाला दिले आहेत. कलाकारांचे शहर म्हणून शहराची निर्माण होत असेल नवी ओळख अभिमानास्पद आहे. संपूर्णपणे नगरच्या मातीत निर्माण झालेल्या कुंकूमार्चन लघुपटाने भारत सरकारचा राष्ट्रीय स्तरावरील ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवत नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवोद्गार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केले आहेत.*
कौटुंबिक मूल्यावर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट या विभागातून कुंकूमार्चनने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. या टीमच्या गौरव समारंभ प्रसंगी काळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर शहर काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे होते. कुंकूमार्चन टीमने नुकत्याच दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा मानाचा पुरस्कार देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला आहे.
नगरकरांच्यावतीने काळे यांच्या हस्ते लघुपटाचे दिग्दर्शक व लेखक ॲड. अभिजीत दळवी, निर्माते पुष्कर तांबोळी, सहनिर्माते प्रणित मेढे, कलाकार बंडू झिंजूर्के, विद्या जोशी, शुभम घोडके, रावसाहेब आळकुटे, नाना मोरे तसेच तांत्रिक बाजू सांभाळणारे अक्षय देशपांडे, सारंग देशपांडे, बिल्वा दळवी, विवेक जोशी, सिद्धांत खंडागळे यांचा सत्कार करत गौरव करण्यात आला. ॲड. दळवी यांच्यासह कुंकुमार्चनच्या टीमने लघुपटाच्या निर्मितीपासून ते राष्ट्रपती पुरस्कारापर्यंतच्या प्रवासाच्या रंजक आठवणी यावेळी सांगितल्या.
काळे यावेळी म्हणाले की, हे यश कुंकूमार्चनच्या टीमचे सांघिक यश आहे. अनेक संकटांना तोंड देत याची निर्मिती झाली आहे. चित्रपटाला उद्योगाचा दर्जा या देशात आधीपासून आहे. मात्र नगरच्या कलाकारांना पाहिजे त्या स्वरूपात स्थानिक पातळीवरती पाठबळ मिळत नाही. हे दुर्दैव आहे. शहरामध्ये चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळेच काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने नगर शहराला चित्रपट उद्योग निर्मितीचे व्यवसायिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. कलाकारांना निश्चितपणे याचा फायदा होईल, असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेस पक्ष कार्यालयाची जागा कलाकारांना सरावासाठी किरण काळे यांच्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल. त्यांच्या पाठीशी उभे राहीले जाईल. व्हीजन डॉक्युमेंट निर्मितीसाठी शहरातील चित्रपट, नाट्य चळवळीतील कलावंत, तंत्रज्ञ आणि सर्व निगडित घटकांची संवाद साधत त्यांचे विचार जाणून घेतले जातील, असे प्रतिपादन चंदनशिवे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. योगेश विलायते यांनी केले.
यावेळी हरीश बारस्कर यांची काँग्रेस सांस्कृतीक विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सतिश सातपुते, साई चासकर, प्रा. रावसाहेब भवाळ, रोहित गायकवाड, कॉ. रामदास वागस्कर, आनंद गोलवड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, सावेडी यावेळी सांस्कृतीक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, हरीश बारस्कर, सतिश सातपुते, साई चासकर, प्रा. रावसाहेब भवाळ, रोहित गायकवाड, कॉ. रामदास वागस्कर, आनंद गोलवड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, शहर जिल्हा सरचिटणीस इम्रान बागवान तसेच चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ, शहरातील कलाप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. होते.