प्रशासकिय

शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘लम्पी योद्धा’ बनून काम करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील “माझे पशुधन, माझी जबाबदारी” हे घोषवाक्य जाहीर

शिर्डी ,२२सप्टेंबर (प्रतिनिधी) – ‘लम्पी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने संवेदनशीलपणे सर्व निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. सर्व पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर ‘लम्पी योद्धा’ बनून काम करावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अकोले येथे दिल्या. “माझे पशुधन, माझी जबाबदारी” हे घोषवाक्य जाहीर करुन, पशुधन वाचविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महसूलमंत्री विखे पाटील यांनी अकोले तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा तसेच लम्पी प्रादुर्भावावर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा अकोले येथील पंचायत समिती सभागृहात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अकोले तहसिलदार सतिष थेटे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.सुनिल तुंबारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोऱ्हाळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यसरकारने सुरु केलेल्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या सेवा पंधरवड्याच्या” निमित्ताने तालुक्यातील खानपट्ट्याचे वितरण संबंधित गावांना मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा आढावा घेवून महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिक सतर्कतेने काम करावे लागेल. लसीकरणावर येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने खासगी डॉक्टरांची मदत घेतली असून, अकोले तालुक्यासारख्या दुर्गम भागात हे लसीकरण अधिक सुलभतेने होण्यासाठी दोन अॅनिमल अॅम्बुलन्स तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक कोटी रुपायांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

कोव्हीडसारख्या संकटावर सर्वांनी एकत्रित येवून मात केली. त्याचपद्धतीने लम्पी प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. पशुधन मालकांसह सर्व अधिकाऱ्यांनी लम्पी योद्धा बनून गावपातळीवर काम केले तर निश्चितच हा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करुन देशातील इतर राज्यांमध्ये जनावरे दगावण्याची संख्या खूप मोठी आहे. मात्र राज्य सरकारने मागील काही दिवसात घेतलेल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे पशूधन वाचविण्यात यश येत असल्याचे विखे पाटील म्हणाले. यापुढे माझे पशुधन माझी जबाबदारी हे घोषवाक्य घेवून पशूधन वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अकोले तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तो शेतकरी पंचनाम्यातून वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे सुचित करुन मंत्री विखे पाटील यांनी सुचित केले. निळवंडे प्रकल्पाच्या संदर्भात असलेल्या अडचणी सोडविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील झालेली अतिवृष्टी, लम्पी आजार तसेच भोगवटा क्रमांक 2 च्या जमीनींबाबत कर्ज प्रकरणात येत असलेल्या अडचणी निकाली काढली असल्याचे बैठकीत सांगितले. सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून अकोले तालुक्यात अकराशे हेक्टर क्षेत्राचे वनपट्टे वितरीत केल्याची माहिती त्यांनी दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे