दलित महासंघाच्या वतीने सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती मुंबईत साजरी होणार!

पाथर्डी दि.२६ जुलै (प्रतिनिधी)
दलित महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मुंबईमध्ये साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला असून, सोमवार, दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये अण्णा भाऊंच्या विचारांचा महोत्सव मोठ्या दिमाखामध्ये साजरा करण्यात येणार आहे. दलित महासंघाची “सिंहगर्जना” मुंबईच्या चौपाटीवर होणार आहे. पुन्हा एकदा अण्णा भाऊ साठे यांच्या कर्मभूमीमध्ये अण्णा भाऊंच्या विचारांचा जयघोष करण्यासाठी आणि मातंग समाजाच्या तमाम प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने एक नवी दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमधील या जयंती महोत्सव समारंभामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील मातंग समाजाचे एक झंजावाती नेतृत्व प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे यांच्या अध्यक्षतेखाली हा जयंती समारंभ संपन्न होणार असून, महाराष्ट्रातील दिग्गज राज्यकर्ते, विचारवंत या अण्णा भाऊंच्या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. तरी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या तमाम मातंग समाजातील आणि विविध पक्ष, संघटना व चळवळीतील कार्यकर्त्यांनी या शतकोत्तर जयंती सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.