सामाजिक

प्रेम व अहिंसेचा संदेश देणा-या “टू मच डेमॉक्रसी” माहितीपटाचा प्रिव्यू नगर येथे संपन्न!

अहमदनगर दि.१९ जुलै (प्रतिनिधी) : तीन काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध आपल्या शिस्तबद्ध व अहिंसात्मक मार्गाने आणि उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धतीने एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या ऐतिहासिक ‘शेतकरी आंदोलना’ने, महात्मा गांधींचा प्रेम व अहिंसेचा संदेश दिल्यामुळे देशातील लोकशाही बळकट झाली असून, शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न सोडवता येतात याविषयी भारतीयांचा आत्मविश्वास दुणावल्याचे प्रतिपादन, “टू मच डेमॉक्रसी” या माहितीपटाचे लेखक व दिग्दर्शक श्री. वरूण सुखराज यांनी काल येथे केले. किसान आंदोलनाचे अंतरंग आणि महत्त्व उलगडणा-या “टू मच डेमॉक्रसी” या माहितीपटाच्या अहमदनगर येथे काल झालेल्या प्रिव्यू नंतर झालेल्या चर्चेच्या दरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्रा. प्रकाश झावरे पाटील, ‘सिटू’चे पदाधिकारी प्रा. मेहबूब सय्यद, रहेमत सुलतान फाउंडेशनचे श्री. युनूस तांबटकर व तारिक शेख, प्रा. प्राजक्ता व अभिजित ठुबे, प्रशांत कोठडिया, प्रसाद झावरे, डॉ. विनय काटे, कॉ. भैरवनाथ वाकळे, उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, तुळशीराम महाराज लबडे, आदी येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.
धार्मिक द्वेष, शत्रूत्व आणि राज्यघटनेची पायमल्ली करून केवळ भावनिक प्रश्नांवर लोकांच्या मनात द्वेष व तिरस्कार पेरण्याच्या काळातही, अशा शांततापूर्ण आंदोलनांमधून आपण पुन्हा एकदा महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, आदी थोर नेत्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करून, आपली संविधानिक लोकशाही व्यवस्था भक्कम करण्याचे आव्हान आपल्या देशापुढे असून, समाज व प्रसार माध्यमांमधून खोटा व द्वेषमूलक विषारी प्रचार व विचार लोकांच्या मनात घुसवला जाऊ नये म्हणून लोकशाहीवादी संवेदनशील नागरिकांनी सक्रीय होऊन विविध समाजघटकांशी सतत संवाद साधला पाहिजे, असेही श्री. सुखराज यांनी सांगितले. या वेळी उपस्थितांपैकी अनेकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना श्री. सुखराज यांनी आंदोलनाची शक्तिस्थळे, विविध संघटनांमध्ये समन्वय राहण्यासाठीचे व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेचे लोकशाहीकरण, लंगर व पारंपरिक भजने या सारख्या धार्मिक परंपरांचे महत्त्व, महिला, वृद्ध शेतकरी आणि युवकांचा लक्षणीय सहभाग, आधुनिक संगीत-माध्यमातून माहितीतंत्रज्ञानाचा केला गेलेला वापर, आंदोलनाची बदनामी करण्याचा आणि तो बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचा शासकीय यंत्रणेच्या दमनकारी प्रवृत्तीचा सामना करताना शेतक-यांनी दाखवलेला संयम व प्रगल्भता, श्री. राकेश टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रूंना शेतक-यांनी दिलेला प्रतिसाद, आदी अनेक विषयांवर श्री. सुखराज यांनी भावस्पर्शी भाष्य करून, एकंदरीतच किसान आंदोलन हे नव्या पिढीसमोर एक चांगले उदाहरण म्हणून मांडले जाण्याच्या गरजेतून या माहितीपटाची निर्मिती झाल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
प्रारंभी, प्रा. मेहबूब सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले; सीए. श्री. प्रसाद झावरे यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमामागील भूमिका मांडली. प्रशांत कोठडिया यांनी प्रश्नोत्तरांचे सूत्रसंचालन केले; डॉ. विनय काटे यांनी आपल्या मनोगतामधून, राजर्षी श्री. छत्रपती शाहू महाराजांवर काढण्यात येणा-या आगामी चित्रपटाची माहिती विशद केली.  कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी, लोकशाहीचा लढा सर्वांनी एकत्र येऊन मजबूत करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे