वृक्षांमुळेच वातावरणात प्राणवायू निर्मिती : उपवनसंरक्षक सुवर्णा माने अहमदनगर उप वनसंरक्षक कार्यालय व स्नेहबंध फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

अहमदनगर दि.४ जुलै (प्रतिनिधी) – प्राणवायूची सर्वांना आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांना प्राणवायू विकत घ्यावा लागला, या समस्येची जाण ठेवून वृक्षांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. वृक्षांमुळेच मोठ्या प्रमाणात प्राणवायू वातावरणात निर्माण होतो, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले.
अहमदनगर उप वनसंरक्षक कार्यालय व स्नेहबंध फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील मूकबधिर विद्यालय व वसतिगृह येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, वनपाल ए.एम. शेरमाळे, वनरक्षक ए.एम. गाडेकर, एस.आर. कराळे, शिल्पकार बालाजी वल्लाल, मुख्याध्यापक दिलीप जगधने, सामाजिक कार्यकर्त्या तेरेजा भिंगारदिवे, आर.बी. भांड, एस.एस. भोंडवे, एस.ए. जेजुरकर उपस्थित होते.
उपवनसंरक्षक माने म्हणाल्या, दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
वृक्ष म्हणजे ऑक्सिजन कारखाना
कुटुंबातील चार सदस्यांसाठी एका वर्षभरात जितक्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. तितका ऑक्सिजन एक सामान्य आकाराचे झाड एका वर्षात निर्माण करते. झाडांकडे केवळ पाच मिनिटे एकाग्र चित्ताने पाहिल्यास मानसिक तणाव चुटकीसरशी नाहीसा होतो. हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
वर्षभरात एक वृक्ष सरासरी १२ किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड शोषून घेते .आणि तितक्याच प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडते. म्हणजे झाडे स्वत: विष शोषून माणसाला जीवनदायी असलेला ऑक्सिजन बाहेर सोडतात, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.