पाणी योजनेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने कर्जतचा पाणी-पुरवठा विस्कळीत

कर्जत( प्रतिनिधी) : दि ३ जुलै
कर्जत शहरात आणि उपनगरात मागील पंधरा-वीस दिवसापासून अनियमित पाणी-पुरवठा होत असून नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा वणवण करावी लागत आहे. एक-आड दिवस येणारे पाणी अनेक प्रभागात मागील चार-पाच दिवसापासून आले नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कर्जत शहरास नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून पाण्याचे शुक्लकाष्ठ संपले होते. तत्कालीन मंत्री प्रा राम शिंदे आणि प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी प्राधान्याने कर्जत शहरासाठी २८ कोटी रुपयांची उजनी-खेड जलसाठ्यातून नळ योजना आणली होती. एक-आड दिवस कर्जतच्या नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होते. यानंतर विद्यमान आ रोहित पवार यांनी देखील कर्जत नळ योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करीत त्यावर कळस चढविला मात्र मागील पंधरा-वीस दिवसापासून कर्जत शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचे नागरिकानीं निदर्शनास आणले आहे. अनेक प्रभागात मागील चार-पाच दिवसापासून पाणीच आले नसून त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर काहींना खाजगी टँकरचा पर्याय अवलंब करून पाण्याची तहान आणि गरज भागवावी लागली आहे. याबाबत कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तथा पाणी पुरवठा समितीचे सभापती भास्कर भैलुमे यांना विचारणा केली असता त्यांनी खेड येथे विजेचा ट्रॉन्सफार्मरमध्ये बिघाड झाला असल्याचे सांगत त्यावर युद्धपातळीवर काम सुरू असून लवकरात-लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे. मात्र तो पर्यंत नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे सत्य ते नाकारू शकले नाही.
***** ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आहे त्यामुळे पाणी-पुरवठा विस्कळीत – मुख्याधिकारी गोविंद जाधव
खेड येथील पाणी-पुरवठा योजनेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड उदभवला असून त्यामुळे शहराच्या पाणी-पुरवठयावर परिणाम झाला आहे. यावर काम सुरू असून मंगळवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
२) कडक ऊन आणि लांबलेल्या पावसाने बोअर आटले
यंदा कडक उन्हाने पाण्याची पातळी खालावली गेली. त्यात एक-दोन चांगल्या पावसाचे अपवाद वगळता जून महिना कोरडा गेल्याने बोअरवेलची पाणी पातळी खालावली गेली तर काही भागात ते पूर्णपणे आटले गेले आहे. यामुळे नागरिकांना खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत असून त्यावर पाण्याची गरज भागवावी लागत आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने पावसाचे पाणी देखील साठवता येत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहे.