राज्य महिला आयोगाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील – उत्कर्षा रुपवते
आयोग सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या हस्ते रुपवतेंचा सत्कार

अहमदनगर दि.२१ (प्रतिनिधी) : महिलांवर होणारे अत्याचार, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, छेडछाड अशा वेगवेगळ्या जाचातून जाव्या लागणाऱ्या महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सातत्याने सुरू असते. महिलांना त्यांनी तक्रार दाखल केला असून कमीत कमी कालावधीत न्याय मिळावा यासाठी आयोगाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी केले आहे.
नुकतीच रुपवते यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या सावेडी येथील जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते रूपवते यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांशी निगडीत विविध प्रश्नांवर रूपवते यांच्याशी काळे यांनी संवाद साधला. यावेळी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, भिंगार काँग्रेस कमिटीचे सागर चाबुकस्वार, मच्छिंद्र जगताप आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उत्कर्षा रुपवते म्हणाला की, महिलांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आदींच्या सहाय्याने महिलांमध्ये त्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. आयोगाचा टोल फ्री क्रमांक हा प्रत्येक महिला, युवतीला माहिती असणे आवश्यक आहे. आयोगाच्या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना तात्काळ मदत मिळू शकते.
महाविद्यालयांमध्ये छेडछाड मुक्त कॅम्पस व्हावा यासाठी पिंक बॉक्स ही संकल्पना आम्ही आयोगाच्या वतीने हाती घेण्याचा विचार करीत आहोत. या माध्यमातून मुलींना निर्भीडपणे त्यांच्या तक्रारी या पिंक बॉक्सच्या माध्यमातून यंत्रणे पर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर खाजगी, सहकारी, छोट्या-मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या आस्थापनांमध्ये महिलांच्या शोषणाविरुद्ध काम करणारी समिती गठीत करणे अनिवार्य आहे. या समित्या गठीत व्हाव्यात यासाठी सुद्धा आयोग प्रयत्नशील आहे, असे यावेळी बोलताना रुपवते म्हणाल्या.
किरण काळे यावेळी म्हणाले की, उत्कर्षा रुपवते या महाराष्ट्रातील धडाडीच्या महिला नेत्या आहेत. गेली अनेक वर्षे त्या महिलांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. त्या स्वतः नगर जिल्ह्यातल्या असून रूपवते परिवाराला सामाजिक, राजकीय कार्याची मोठी पार्श्वभूमी आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याचे काम रूपवते निश्चित करतील असा आशावाद यावेळी काळे यांनी व्यक्त केला. यावेळी महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, राणीताई पंडित यांनी महिलांच्या विविध प्रश्नांबाबत रूपवते यांचे लक्ष वेधले.