शहरातील पाणीपुरवठा योजनांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार.- पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे
राहुरी नगर नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

अहमदनगर.दि.१७ मे (प्रतिनिधि) शहरातील विविध भागाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण,रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. राहुरी नगर नगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि विकासकामांचे भूमिपूजन,राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, ऊर्जा व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते.राहुरी येथील राजवाडा परिसर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अनिल कासार, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे,साई संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे,राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री श्री बनसोडे म्हणाले, शहरातील रस्ते विकास, वाड्या वस्त्यांमध्ये विकासात्मक कामे, नगरपरिषद शाळांचे सक्षमीकरण आदि सुविधा साठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असून शहरातील पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले. श्री बनसोडे यांचे हस्ते राजवाडा परिसरातील, बुद्ध विहार नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राहुरी नगरपालिकेच्या विकास कामांमध्ये, शहराचे सुशोभीकरण करणे, महात्मा फुले चौकाचे सुशोभिकरण भूमिपूजन,साईनगर येथील खुला भूखंड विकसित करणे अशा जवळपास एक कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ यावेळी राज्यमंत्री श्री बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. ऊर्जा व आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यावेळी म्हणाले,शहरातील नगरपालिकेच्या शाळां डिजिटल स्वरूपातील करण्यासाठी, भूमिगत गटारीची कामे,रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण आदी कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रला राहुरी नगरपालिकेचे आजी,माजी नगरसेवक, राहुरी शहरातील नागरिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.