मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिन – किरण काळे
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयात झेंडावंदन उत्साहात संपन्न

अहमदनगर दि.२ मे (प्रतिनिधी) : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० साली झाली. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. हे महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. आजच्या एकूण समाजव्यवस्थेमध्ये कामगार या घटकाचे देखील महत्त्व अनन्यसाधारण आहे. कामगारांच्या अधिकारांवर गदा येणार नाही, यासाठी आपण अधिक सजग राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयात काळे यांच्या हस्ते झेंडावंदन उत्साहात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, हनीफ जहागीरदार, राहुल गांधी विचार मंचाचे शहर जिल्हाध्यक्ष सागर निरमल आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले की, आजचा महाराष्ट्र हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आहे, म्हणून तो नेटाने, डौलाने आणि अभिमानाने उभा आहे. मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारच्या पाठींब्याने शिजत आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाची केंद्र ही सातत्याने गुजरातला स्थलांतरित करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारच्या वतीने सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारे आहे.
काही घटक हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील चांगले असणारे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. द्वेषाचे राजकारण करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ असून महाराष्ट्राला तोडण्याचे काम जे-जे लोक करतील त्यांना खड्यासारखे उचलून बाजूला करण्याचे काम महाराष्ट्राची सुज्ञ जनता करेल, असे यावेळी बोलताना काळे म्हणाले.