कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना “एम्पलॉयी ऑफ द मंथ मार्च २२” पुरस्कार

कर्जत प्रतिनिधी : दि २ एप्रिल
कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना विभागीय आयुक्त नाशिक नगरपरिषद प्रशासन शाखेतून मार्च २२ साठी मुख्याधिकारी संवर्गातून “एम्पलॉयी ऑफ द मंथ” सन्मान मिळाला आहे. यापूर्वी महसुल विभागातून ऑक्टोबर २१ मध्ये कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना असाच बहुमान मिळाला होता.
नाशिक विभागातून प्रशासन कार्य, कामकाजाची पद्धत अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, पारदर्शक, गतिमान व्हावे. यासह वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयात नमूद निष्कर्ष आणि उद्दिष्टप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी पार पाडत असलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याना “एम्पलॉयी ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानीत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मार्च २०२२ या महिन्यात कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी माझी वसुंधरा अभियान १ मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त, माझी वसुंधरा २ मध्ये ५० हजार वृक्षांची लागवड, मियावाकी घनवन पद्धतीने वृक्षारोपणास प्राधान्य, सर्व सामाजिक संघटना कर्जत यांच्या १०० श्रमदात्याचे सलग ५५० दिवस वृक्षारोपण आणि श्रमदानाचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रमास नागरिकांकडून १२.५० लाखाची देणगी, लोकसहभागातून वृक्षारोपणास प्राधान्य, मुख्याधिकारी संवर्गात निर्धारित केआरएमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त या कामगिरीने मुख्याधिकारी जाधव यांना ” मार्च २०२२ एम्पलॉयी ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुख्याधिकारी जाधव यांचे कर्जत तालुका प्रशासन, राजकीय पदाधिकारी यासह सर्व सामाजिक संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले.