महसुल वसुली उद्दिष्टे पूर्ण करण्यात कर्जत उपविभागाची उल्लेखनीय कामगिरी
१४२% वसुली करीत कर्जत तहसील विभागाची प्रथम स्थानी झेप

कर्जत (प्रतिनिधी ): दि १ एप्रिल
कर्जत उपविभागाने सन २०२१-२२ मध्ये महसुल विभागाच्या विविध माध्यमातून ११५ % वसुली उद्दिष्ट पूर्ण केले असून यात जिल्ह्यात कर्जत तहसील कार्यालयाने अव्वल स्थान पटकावले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. यामध्ये कर्जत तहसील कार्यालयाच्या १४२% तर जामखेड तहसीलचा ८४% वसुली उद्दिष्टचा समावेश आहे असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. याकामी जिल्हाधिकारी अहमदनगर डॉ राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही उद्दिष्टे पार करण्यात आली.
कर्जत उपविभागाने यंदाच्या २०२१-२२ साली कर्जत आणि जामखेड महसुल विभाग अंतर्गत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक आणि सर्व तलाठी यांच्या अथक प्रयत्नातून कर्जत उपविभागास एकूण १८ कोटी ७१ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना २१ कोटी ५८ लाख वसुली साध्य करून ११५% पूर्ण करीत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यात आणि उपविभागात कर्जत तहसीलने १४२% वसुली पूर्ण करून अव्वल स्थान पटकावले आहे. कर्जत तहसील कार्यालयाने जमीन महसुलीकरीता ३ कोटी ८ लाख उद्दिष्ट असताना ३ कोटी ३९ लाख साध्य करीत ११०% वसुली करण्यात आली तर गौण खनिज वसुलीमध्ये ६ कोटी ६७ लाख उद्दिष्ट होते यात १० कोटी ८२ लाख वसुली साध्य केली. एकूण उद्दिष्ट ९ कोटी ७५ लाख असताना कर्जत तहसील कार्यालयाने १४ कोटी २२ लाख जमा करीत अव्वल स्थान घेतले. ही शासकीय वसुली जमीन महसुल, अनधिकृत अकृषक कर, तुकडेबंदी, नजराणा, विक्री परवानगी प्रकरणे, अंतर्गत दंड, शासकिय कामातील स्वामित्वधन, वीटभटटी, मोबाईल टॉवर्स, खाणपटटे, क्रशर्स आदी महसुली कामातून जमा करण्यात आली. शासकीय वसुलीचे उद्दिष्ट अत्यंत अल्प कालावधीत कर्जत तहसीलने पूर्ण केले असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
****** दोन्ही तहसीलदारासह सर्व महसुल कर्मचाऱ्याचे महत्वपूर्ण योगदान – डॉ अजित थोरबोले
कर्जत उपविभागाने सन २०२१-२२ मध्ये ११५% वसुली उद्दिष्ट पार केले असून याकामी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह दोन्ही तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आणि सर्व महसुली कर्मचारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. सर्वांच्या सहकार्याने कर्जत तहसीलने अव्वल कामगिरी केली आहे. ही उपविभागासाठी गौरवास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांनी दिली.