कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात स्थानिक मंत्र्यांनाच डावलले
कुलगुरू व प्रशासनाचा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप

बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी – महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संस्थापक व तालुक्यातील सहकाराचे उध्वुर्य डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांचे वारस व राज्यातील सरकारचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच विद्यापीठाच्या ५४ व्या स्थापना दिन कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी, कामगार व जनतेतून विद्यापीठाचे कुलगुरू व प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त होत आहे.
डॉ. बाबुराव दादा तनपुरे यांनी विकासाची दुरदृष्टी ठेवून शेतकरी व कामगारांच्या भविष्यासाठी राहुरीत विद्यापीठ असावे म्हणून तत्कालीन सरकारकडे आग्रह धरला व विद्यापीठाची स्थापना केली बरोबरच शेतीसिंचनाचा भविष्यकालीन वेध डोळ्यासमोर ठेवून मुळा धरणाची निर्मिती केली तर तालुका ऊसाचे आगार म्हणून संबोधला जायचा या ऊसाचे गाळप तालुक्यातच होवून जास्तीचे दोन रुपये शेतकऱ्यांना मिळावे या उद्देशाने सहकार तत्वावर साखर कारखान्याची उभारणी केली शेतकरी, कामगार, महिला, मजूर, छोटेमोठे कारागीर व उद्योग व्यवसायातून तालुका प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तालुक्यातील सहकाऱ्यांसमवेत त्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली त्याची यथोचित फळे आजच्या पिढीला मिळत आहेत विकासाची द्रुष्टी असलेला नेता म्हणून डॉ. तनपुरेंची ओळख आजही जून्या पिढीतील अनेकजण गौरवाने सांगतात.
मात्र त्याच विकासगंगेच्या स्थापना दिन कार्यक्रमात डॉ. तनपुरेंचे तिसऱ्या पिढीतील वारसदार व राज्य शासनातील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा विसर विद्यापीठाच्या कुलगुरूंना पडला असल्याचे वास्तव या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून समोर आले आहे.
राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील कुलगुरुपदी नियुक्त झाल्यापासून हे प्रकार घडत आहेत कुलगुरू डॉ. पाटील यांनी पदभार स्विकारल्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ झाला त्या वेळी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतही मंत्री तनपुरे यांना स्थान देण्यात आले नव्हते त्यानंतर या राहुरी कृषी विद्यापीठाचा अतिशय महत्वाच्या ५४ व्या स्थापना दिनी विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या कार्यक्रमात कुलगुरूंना व विद्यापीठ प्रशासनाला स्थानिक मंत्र्यांचा विसर पडला असल्याचे दिसुन येते अतिशय महत्वाच्या कार्यक्रमात ना. तनपुरे यांना निमंत्रीत करणे गरजेचे होते मात्र विद्यापीठ प्रशासनाने याचा कोणताही विचार केलेला दिसत नाही कुलगुरू व त्यांचे अधिकारी मनमानी कारभार करत आहेत या मनमानी कारभार करणाऱ्या कुलगुरुंचा असा कर्ता करविता धनी कोण असा सवाल स्थानिक शेतकरी, कामगार वर्गातून विचारला जात आहे.