विधायक कामांवर भर देत ‘स्नेहबंध’चे काम : आमदार जगताप
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांचा सत्कार

अहमदनगर दि.१४ मार्च (प्रतिनिधी) – समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना मदतीचा हात आपण दिला तर त्यांचे आयुष्य सुकर होऊ शकते. नवीन पिढीला सोबत घेऊन विधायक कामांवर भर दिला, तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. या विचारातून स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे हे कार्यरत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाज पुरस्कार २०२२ प्रदान पुणे येथे स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांना मिळाला. त्यानिमित्त आमदार जगताप यांनी शिंदे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, अभिनेते मोहिनीराज गटणे, अभिजीत ढाकणे, गणेश बोरुडे, तुषार मेघळे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, समाजात शिंदे यांच्यासारखे चांगले लोक आहेत. किमान एकाला तरी मदत करावी हा चांगला विचार घेऊन स्नेहबंध फाउंडेशन काम करत आहे. नवीन पिढीला सोबत घेऊन विधायक कामांवर भर दिला, तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, हे शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून दाखवून दिले आहे.
प्रा. विधाते म्हणाले, छोट्या कुटुंबपद्धती आणि आपल्यापुरतेच पाहणाऱ्या काळात सामाजिक कार्य उभारणे आणि दुसऱ्याची सेवा करणे कठीण काम असते. शिंदे यांच्यासारखे मोजकेच लोक इतरांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतात. प्रत्येक जण स्वतःसाठी जगत आहेत. या जगण्याला अर्थ नाही. त्यामुळे प्रत्येकांनी समाजाचे काहीतरी देणे लागतो, असे समजून कार्य केले पाहिजे.
*****
पुरस्कारामुळे मिळाली ऊर्जा
पुरस्कारामुळे मला ऊर्जा मिळाली. सामाजिक काम करताना प्रचंड अडचणी येतात. ‘स्नेहबंध’चे काम कोणतीही मदत न घेता हे काम सुरू आहे. समाजातील अनेक नागरिक आम्हाला मदत करतात. त्यामुळे अनेक प्रश्न सुटत आहेत, असे ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.