अहमदनगर जिल्ह्यात पर्यटन विकासाला वाव – श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड
पर्यटन संचालनालयाच्या ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणास सुरूवात
अहमदनगर दि. 04( प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्यात पर्यटन विकासाला खूप मोठया प्रमाणात वाव असून पर्यटक मार्गदर्शकांना त्याद्वारे रोजगार उपलब्ध होवू शकतो. असे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाच्या नाशिक विभागाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई – राठोड येथे केले.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या नाशिक विभाग उपसंचालक कार्यालयामार्फत अहमदनगर जिल्हयातील पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन नुकतेच अहमदनगर येथे श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ग्वालियर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रशिक्षक अमित तिवारी, पर्यटन संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
श्रीमती सरदेसाई-राठोड म्हणाल्या, शासनातर्फे हे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले असून प्रशिक्षणार्थीनी याचा लाभ घेवून अहमदनगरच्या पर्यटन वाढीसाठी काम करावे.
अहमदनगर येथील ५० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण १ ते ५ मार्च २०२२ या कालावधीत तर भंडारदरा येथील ५० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण ७ ते ११ मार्च २०२२ कालावधीत होणार आहे. पर्यटन संचालनालया मार्फत स्थानिक प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करून या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील तब्बल १४ प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.असे ही श्रीमती सरदेसाई-राठोड यांनी सांगितले.
श्री. तिवारी म्हणाले, महाराष्ट्रात विविध प्रकारचे पर्यटन स्थळे असून शासन स्तरावरून पर्यटन वृद्धीसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना शासनाने एक संधी उपलब्ध करून दिली असून त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा.
या पर्यटन सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षणात पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.