सण_उत्सवकाळात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत
अहमदनगर – दि.24 (प्रतिनिधी) – ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2017 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार 2022 वर्षासाठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्गमीत केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालय, मुंबई जनहित याचिका क्र.173/ 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती 19 फेब्रुवारी, डॉ. आंबेडकर जयंती 14 एप्रिल, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर तर गणपती उत्सव 2 दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव 3 दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी ), उर्वरित 2 दिवस या सण-उत्सवांचा समावेश आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्राची माहिती घेऊन सदर भागातील ध्वनीमापक यंत्राद्वारे ध्वनीचे कंट्रोल नमुने घ्यावेत. त्याबाबत पंचनामा व ठाणे दैनंदिनी मध्ये नोंद घ्यावी. (शांतता क्षेत्र, मिरवणुकीचा मार्ग, महत्त्वाची ठिकाणे) एखाद्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन आजूबाजूच्या लोकांना व सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. अशी तक्रार आल्यास ती लिहून घ्यावी व स्टेशन डायरीला नोंद करून त्या तक्रारीच्या आधारे खरे-खोटेपणा पाहण्यासाठी घटनास्थळी जावे. घटनास्थळी गेल्यावर दोन पंचांसमक्ष ध्वनीची तीव्रता मोजण्याच्या उपकरणाच्या साहाय्याने घटनास्थळी ध्वनीची तीव्रता किती आहे याची नोंद घ्यावी. घटनास्थळाचे छायाचित्रण करावे, तीव्रताही मानक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास उचित प्राधिकरणाकडे पाठवून द्यावे. घटनास्थळी जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या अहवालासोबत चौकशीचे सर्व कागदपत्रे त्वरित पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 व ध्वनी प्रदूषण नियम (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील तरतुदीप्रमाणे निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावे. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशांमधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहिता नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.