प्रशासकिय

‘लोकसंवाद-2026’ अंतर्गत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 18 सप्टेंबर : ‘गणेशोत्सव’ हा महाराष्ट्रातील लोकसहभागाचा मोठा उत्सव असून राज्य शासनाने या उत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच गावागावांत होणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीचा प्रभावी उपयोग करून शासनाचे धोरणात्मक निर्णय, विविध कल्याणकारी योजना आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान-2026 अंतर्गत अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज येथे मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वयक रोहित कारंडे यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील सुमारे 52 टक्के नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले असून उर्वरित पात्र नागरिकांनीही आयुष्मान कार्ड तसेच वय वंदना कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य उपचाराचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 107 खासगी रुग्णालये अंगीकृत असल्याचेही श्री. कारंडे यांनी सांगितले. त्यामुळे पात्र नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह कार्ड काढून घ्यावे आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी ‘लोकसंवाद-2026’ या उपक्रमाचा उद्देश आणि त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. शासनाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारा लोकसहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा उपस्थित नागरिकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमास अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्राचार्य डॉ. पवार, जिल्हा समन्वयक डॉ. स्वप्नील तुपे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे