देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 4 ऑगस्ट : फिर्यादी सुनिता भिवसेन घोरपडे हिचे दि. १४/०३/२०२६ रोजी माधुरी किरण जेधिया व शिवांगी रणजित चावरे यांचेबरोबर झालेले भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी व साक्षीदार अविनाश भिवसेन घोरपडे, भिवसेन बाजीराव घोरपडे यांना अहिल्यानगर शहरातील बेंद्रे हॉस्पिटलजवळील झोडपी कॉलनी येथील पाण्याच्या टाकीखाली बोलावून घेतले. तेथे आरोपी (१) किरण मोहन जेधिया (२) सनी रणजित चावरे (३) विजय राजू पठारे (४) अजय राजू पठारे (५) निलेश बाबासाहेब पठारे सर्व रा. सिध्दार्थनगर ता.जि.अहिल्यानगर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी गज व लाकडी दांडके घेऊन येऊन आरोपी विजय राजू पठारे याने फिर्यादी यांचा मुलगा साक्षीदार अविनाश घोरपडे यास काहीएक न विचारता त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने, आरोपी अजय राजू पठारे याने त्याचे हातातील तलवारीने व आरोपी सनी रणजित चावरे याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने साक्षीदार अविनाश घोरपडे यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे डोक्यात, पोटावर, पाठीवर वार करून गंभीर जखमी केले आहे. त्याच वेळी आरोपी किरण मोहन जेधिया व निलेश बाबासाहेब ससाणे यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने रॉडने अविनाश घोरपडे यांचे हाता पायावर जबर मारहाण करून त्यांचा पाय व हात मोडून त्यास गंभीर जखमी केले आहे. त्यावेळी साक्षीदार भिवसेन बाजीराव घोरपडे हे भांडणामध्ये पडले असता आरोपी निलेश बाबासाहेब ससाणे याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने भिवसेन घोरपडे यांचे डावे हातावर मारून जखमी केले आहे. तसेच साक्षीदार पोपटराव भानुदास पाथरे हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता त्यांना आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली आहे. त्यामुळे साक्षीदार घाबरून आण्णाभाऊ साठे चौक सिध्दार्थनगर ता.जि.अहिल्यानगर येथे पळाला असता दुपारी १.५० वा.चे सुमारास आरोपी विजय पठारे व अजय पठारे यांनी त्यांचे पाठीमागे जाऊन आण्णाभाऊ साठे चौकात साक्षीदार पोपटराव पाथरे यांना आरोपी विजय राजू पठारे याने त्याचे हातातील लोखंडी दांडयाने व आरोपी अजय राजू पठारे याने लाकडी दांडयाने त्यांचे हातापायावर मारून गंभीर जखमी करून आरोपी विजय पठारे याने साक्षीदार पोपटराव पाथरे यास तू जर पोलिसात तक्रार दिली तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही.तू माझ्या विरोधात निवडणुक लढवतो काय ? मी सिध्दार्थनगर मध्ये जे सांगेल तेच होईल, अशी धमकी दिली वगैरे मजकुराचे फिर्यादी वरून तोफखाना पोलीस स्टेशन, गु.र.नं १८४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१),११८(१), ११८(२),१८९(१),१८९(२),१८९(४),१९०,३५१(२), ३५२ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे दि.१५/०३/२०२६ रोजी १९.२८ वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
*नमूद दाखल गुन्ह्याचे तपासादरम्यान सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेविरुद्ध विविध पोलीस स्टेशनला शरिराविरूद्ध व मालाविंरूद्ध गुन्हे दाखल असून आरोपींनी सदरचा गुन्हा हा संगनमत करून धाकदपटशा दाखवून स्वतःला व टोळीतील सदस्यांना आर्थिक लाभ मिळविण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींनी संघटीतपणे एकत्रित येवून टोळीप्रमुख विजय राजू पठारे याचे नेतृत्वाखाली त्याचे टोळीतील इतर सहकारी यांचे एकमेकांचे संपर्कात राहून व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता तीन वर्षापेक्षा अधिक शिक्षा असलेले गुन्हे केल्याचे दिसून आले आहे तसेच सदरचे आरोपी हे अतिशय उन्मत्त, निर्ढावलेले व प्रचलित कायद्याला न जुमनणारे सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांचे वर्तनावरून दिसून आले आहे. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून देखील त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नसल्याने पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन यांनी यातील आ.क्र. १ ते ५ यांचे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) हे वाढीव कलम लावणे बाबत
तोफखाना पोलीस स्टेशन येथून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना अहवाल सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी त्यांचे कार्यालयाकडील आदेशाद्वारे सदर प्रस्तावास मंजुरी देवून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांनी करणेबाबत आदेशीत केलेले आहे. त्यावरून नमूद गुन्ह्यात दि- २०/०६/२०२६ रोजी २२.४० वा. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (ii), ३ (२) व ३(४) हे वाढीव कलम लावण्यात आले नंतर सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, अहिल्यानगर हे करत आहेत.सदरचा गुन्हा दाखल झाले पासून आरोपी नामे विजय राजु पठारे, वय ३९ वर्षे, रा. सिद्धार्थनगर, ता.जि. अहिल्यानगर याचा अनेक दिवसापासुन शोध चालु होता, परंतु तो दरवेळी पोलीसांना गुंगारा देत होता. त्याच्या शोध साठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र एक पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने आरोपी विजय राजु पठारे याचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये जावून शोध घेतला परंतु आरोपी हा मिळून येत नव्हता.त्यावरून मा. न्यायालयाने विजय राजु पठारे याचे मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते. *आज दि.०३/०८/२०२६ रोजी तोफखा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी विजय राजु पठारे हा शेंडी बायपास येथे येणार आहे, अशी गुप्त बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश चाहरे व पोलीस अंमलदार यांना बातमीची माहिती देवून आरोपी विजय राजु पठारे यास ताब्यात घेण्याबाबत कळविले असता पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहरे तसेच पोलीस स्टाफने शेंडी बायपास परिसरामध्ये सापळा लावून विजय राजु पठारे यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे. विजय पठारे याचे विरूद्ध तोफखाना पोलीस स्टेशन गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असून तोफखाना पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये यापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. मुम्मका सुदर्शन सो, मा. अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री. वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, नगर शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. बालाजी वैद्य, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहरे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा