देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी :दि. 15 मे :मनपाची नियोजित सर्वसाधारण सभा अचानक तहकूब झाली. सुमारे 114 कोटींच्या कर्जावर उभारण्यात येणाऱ्या नियोजित पाच व्यापारी संकुलांतील कमर्शियल गाळ्यांच्या वाटपाचा मलिदा कोणी किती खायचा यावरून राष्ट्रवादी – भाजप नगरसेवकांत तू, तू – मै, मै झाल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवल्याचा दावा, ठाकरे शिवसेना महानगर प्रमुख किरण काळेंनी केला आहे. ही सभा तहकूब झाल्यामुळे काही भ्रष्ट अधिकारी, राजश्रयीत ठेकेदार यांचा देखील हिरमोड झाल्याचे काळे म्हणाले.
दोघांची सत्ता असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटच सबकुछ आहे. त्यांचीच मनमानी आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व भाजपला कवडीची ही किंमत देत नाही. पालकमंत्री ज्येष्ठ व अनुभवी नेते असून देखील त्यांचाही मान राखला जात नाही, असा दावा काळेंनी केला आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी लग्नसराई मुळे सभा रद्द झाल्याचा खुलासा केला. तो धादांत खोटा असल्याचे म्हणत काळे म्हणाले, आयुक्त अजून किती दिवस लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचणार आहेत ? ते आयुक्त आहेत की कुण्या एका राजकीय नेत्याचे प्रवक्ते ?, असा सवाल त्यांनी केला आहे.
गाळ्यांचा मालिद्या वरून वरून नगरसेवकांत हमरी – तुमरी :
काळेंनी दावा केला की, गुरुवारी रात्री उशिरा सावेडीत एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी शहरातील सत्ताधारी नगरसेवकांची अनौपचारिक बैठक झाली. दोन्ही पक्षांचे प्रमुख नगरसेवक यावेळी उपस्थित होते. पाच व्यापारी संकुलां मध्ये मिळून लाखो स्क्वेअर फिटचे शेकडो कमर्शियल गाळे कर्ज घेऊन बांधण्याचा घाट सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र हे गाळे बांधण्या पूर्वीच भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी पेक्षा जास्त गाळे आणि त्यांचा मालिद्याच वाटप करून हव आहे.
राष्ट्रवादी तो द्यायला तयार नाही. आमदार आमचा असल्यामुळे आम्हाला जास्त गाळे हवेत, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. यावरून त्या बैठकीत जोरदार वादंग झालं. दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकावर अक्षरशः धावून गेले. त्यांच्यात हमरी – तुमरी झाली. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही एक देणं – घेणं नसून निवडणूक काळात मतं विकत घेण्यासाठी वाटलेले कोट्यावधी रुपये या पाच वर्षात शहराला कर्जाच्या खाईत लोटून वसूल करायचे आहेत. त्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचा आरोप, किरण काळे यांनी केला आहे.
…तर भाजपने सत्तेला लाथ मारावी, ठाकरे शिवसेनेचा खोचक सल्ला :
सभेची विषय पत्रिका ठरवताना भाजपला विचारात घेतल जात नाही. पालकमंत्री व माजी खासदारांनी केलेल्या सूचनांना राष्ट्रवादी केराची टोपली दाखवते. विकास कामांच्या टेंडरचा मलिदा केवळ राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना मिळतो. भाजप नेतृत्वाचा मान राष्ट्रवादी ठेवत नाही. भाजपचे नेतृत्व अनुभवी, मोठे आणि राज्य पातळीवरील आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील आहे. स्वाभिमान गहाण ठेवावा लागत असेल, वारंवार अवमान होत असेल तर भाजपने अशा सत्तेला खरं तर लाथ मारली पाहिजे, असा खोचक सल्ला ठाकरे शिवसेनेच्या वतीने किरण काळे यांनी दिला आहे.
“अर्थ”पूर्ण हितसंबंध जोपासणाऱ्या विषयांनाच प्राधान्य का ? :
पंपिंग स्टेशन, सावेडी ते कल्याण रोड – अमरधाम पर्यंत ३० मीटर रुंदीच्या रिंग रोड करिता बाधित होणाऱ्या जमिनीचे भूसंपादन, केडगावच्या सर्वे नंबर २०८ मधील जागेचे रस्त्यासाठी भूसंपादन करणे, यापूर्वी निकृष्ट झालेल्या कामांच्या अनामत रकमा परत करणे, बँकांकडून शेकडो कोटींची कर्ज काढणे आदी विषय सभेच्या विषय पत्रिकेवर होते. यासाठी मनपाला कोट्यावधी रुपये लागणार आहेत. मनपा तिजोरीत खडाखडात असताना जनहिताचे प्रश्न सोडून सत्ताधाऱ्यांच्या केवळ “अर्थ”पूर्ण हितसंबंध जोपासणाऱ्या विषयांनाच प्राधान्य का दिले जाते ?, असा सवाल किरण काळे यांनी केला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा