देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि.18 नोव्हेंबर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रिपब्लिकन सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात शहर व जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक तसेच गोरगरिबांच्या मूलभूत सुविधांबाबत सर्वांगीण चर्चा करण्यात आली.
मेळाव्यात विशेषत शहरातील अनेक कुटुंबे अद्यापही घरकुलासारख्या मूलभूत सुविधांपासून व विविध शासकीय योजनांपासून वंचित असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. अशा कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांच्या समस्यांचे दस्तावेजीकरण करून, शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेना ही फक्त संघटना नसून, ही दलित-शोषित-पीडितांच्या न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. जिल्ह्यातील एकही गोरगरीब कुटुंब घरकुलापासून, पेन्शनपासून किंवा इतर शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही लढा देऊ. प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी ओळखून त्या शासनाच्या स्तरावर मांडाव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांना बळ देणे हीच आमची प्राथमिकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत आहे.
युवकांना संघटनेत मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन सामाजिक प्रश्नांवर ठोस लढा उभा करायचा आहे. समाजातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्या हक्कासाठी रिपब्लिकन सेना सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, जिल्हा संघटक संजय ताकवले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू वाघमारे, महिला शहराध्यक्ष सुनीता शिंदे,
सनी माघाडे, विवेक विधाते, बेबीताई टकले, सविता कवडे, निलोफर पठाण, आसीर सय्यद, सरस्वती साठे, नेहा जावळे, रूपाली आईची, राजू उल्हारे, विवेक रणदिवे, प्रताप पवार आदिसह विविध पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या शेवटी आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, जनसंपर्क मोहीम व शासकीय योजनांबाबत जागृती अभियान राबविण्याचा ठराव करण्यात आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा