सामाजिक संघटनांच्या सहकार्यामुळेच कोरोनाचा सक्षमपणे मुकाबला केला:पवार
स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांचा सत्कार

अहमदनगर / प्रतिनिधी -कोविड सारख्या जागतिक संकटावेळी भिंगारच्या जनतेने केलेले सहकार्य व प्रेम विसरणे शक्य नाही. स्नेहबंध फौंडेशन व इतरही सामाजिक संघटना या महामारीच्या काळात प्रशासनाबरोबर कार्यरत होत्या. त्यामुळे आपण या संकटाचा मुकाबला सक्षमपणे करू शकलो, असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी केले.
स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची उत्तर विभागाअंतर्गत आग्रा येथे पदोन्नतीने बदली झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात पवार बोलत होते. स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी स्मृतिचिन्ह व शाल देऊन पवार यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, वरिष्ठ अभियंता महेंद्र सोनवणे, गणेश भोर, प्रमोद भुजबळ, लेखाधिकारी सुनील शिंदे, प्रभारी मुख्याध्यापक संजय शिंदे, अशोक फुलसौन्दर, शिशिर पाटसकर, आकाश साळुंके, संकेत शेलार, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.
स्नेहबंध चे अध्यक्ष शिंदे म्हणाले,
पवार यांनी छावणी परिषद क्षेत्रात कोविड काळात जनतेला आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून उत्कृष्ट सेवा दिली. तसेच लसीकरणातही भिंगार आज सर्वात पुढे आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.