राजकिय

” ते ” म्हणाले, गुजराथी समाजाबद्दल माझ्या मनात आपलेपणा, बंधुत्वाची भावना

अहमदनगर दि. 23 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : आम्हाला सत्ता द्या. आम्ही दरवर्षी २ कोटी रोजगार युवकांसाठी निर्माण करू, असं मूळ गुजरातच्या असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. ७ वर्षात सुमारे १४ कोटी रोजगार युवकांसाठी निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र वस्तुस्थितीत कोणताही रोजगार मिळालेला नसून तरुणांमध्ये नैराश्य आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. गद्दारी करत सत्तेवर आलेल्या राज्यातील सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला भेट म्हणून देवून महाराष्ट्रासह नगरच्या तरुणाईला रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवल्याचा घाणाघात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग पळविणाऱ्या गुजरातच्या नेत्यांना जनताच धडा शिकवेल असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात नगर शहरात बुधवारी निदर्शने करण्यात आली होती. यावेळी गुंदेचा यांनी गुजराथी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप देखील भाजपने केला होता. याबद्दल गुंदेचा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केला आहे की, गुजराथी समाजाबद्दल माझ्या मनामध्ये बंधुत्वाची, आपलेपणाची भावना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्यांचा गुजराथी बांधवांसमवेत माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा प्रेमाचा ऋणानुबंध आहे. माझे वडील सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा यांनी गुजराथी समाजाचे नेते व विकासपुरुष म्हणून विकासात्मक कामे केलेले नगर शहराचे दिवंगत आ. नवनीतभाई बार्शीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केले आहे. त्यांच्या व्हिजनमुळेच नगरमध्ये आज रोजी जी काही विकासाची कामे त्या काळात उभी राहिली आहेत त्याबद्दल नगरकरांसह माझ्या मनात ही कृतज्ञतेची भावना आहे.

गुंदेचा पुढे म्हणाले, त्यामुळे शहरात राहणाऱ्या माझ्या गुजराथी समाज बांधवांबद्दल त्यांच्या भावना दुखावल्या जातील असं कुठल्याही प्रकारच मी वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी सोशल मीडियामध्ये तशी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र भाजपच्या अर्बन बँक घोटाळ्यातील एका दिवंगत नेत्याच्या युवा पुत्राने ‘ ध ‘ चा ‘ मा ‘ करत मी गुजराथी समाजाबद्दल चुकीची पोस्ट केल्याचा गैरसमज पसरवून त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला. याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. समाज बांधवांचा खांदा वापरला. अर्बनच्या ठेवीदारांच्या आसूड मोर्चात मी सहभागी होऊ नये यासाठी या माध्यमातून गैरसमज निर्माण करत अन्य समाज बांधवांना पुढे करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या भाजपा युवा नेत्याचा होता. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एखाद्या समाजाची राजकीय ढाल म्हणून उपयोग करणे हे त्यांना वेठीस धरल्या सारखे आहे. अशा प्रवृत्तींपासून सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. काही झाले तरी अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठीचा लढा हा सातत्याने चालूच राहील असा इशारा गुंदेचा यांनी दिला आहे.

दरम्यान, बुधवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चौपाटी कारांज येथे याच विषयावरून आंदोलन देखील केले. त्यामुळे माझ्या विरोधात पडद्या आडून राजकीय षडयंत्र करणाऱ्या शहर भाजपचा कट कारस्थानी चेहरा समोर आल्याचे गुंदेचा यांनी म्हटले आहे. भाजपला जर खरीच जनतेची काळजी असेल तर त्यांनी दरवाढ, महागाई, बेरोजगारी, जातीय, धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या स्वपक्षाच्या व केंद्र, राज्य सरकारच्या, नगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था, नगर मनपाकडून जाचकरित्या प्रस्तावित असणारी परवाना शुल्क वसुली, कचरा संकलन आदी ज्वलंत प्रश्नांच्या विरोधात जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असा टोला गुंदेचा यांनी शहर भाजपला लगावला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे