युक्रेनमध्ये अडकलेल्या नगरमधील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी किरण काळेंनी साधला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क
मंत्री थोरात, खा.सुळे यांचेही वेधले लक्ष
अहमदनगर /प्रतिनिधी : रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. यामुळे युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. परराष्ट्र खात्याचे मंत्री डॉ.एस. जयशंकर यांना याबाबत काळे यांनी ईमेल लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांचे देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधून लक्ष वेधले आहे.
काळे यांनी याबाबत भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की, भारतीय परराष्ट्र खात्याकडे व युक्रेन येथील भारतीय एम्बसीकडे नगर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावे व त्यांची संपर्क करण्यासाठीची माहिती उपलब्ध आहे. यामध्ये अहमदनगरच्या सुमारे २२ ते २३ विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्वांशी तातडीने संपर्क करून भारताद्वारे विशेष विमान पाठवून नगर शहर व जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तसेच नोकरी व पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्याची तातडीने हालचाल करावी अशी मागणी केली आहे.
यामध्ये लक्ष घालण्याची विनंती त्यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व खा. सुप्रिया सुळे यांना देखील ई-मेल द्वारे केली आहे. तसेच ना.थोरात व खा.सुळे यांच्याशी फोनद्वारे देखील संपर्क साधला असून त्यांना नगरमधील विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत सहकार्य करण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले आहे.
अहमदनगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी या संस्थेमार्फत विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहे. संस्थेचे डॉ. महेंद्र झावरे यांच्याशी देखील काळे यांनी संवाद साधला असून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप निश्चित व झावरे यांच्यामध्ये समन्वय घालून दिला आहे. जिल्हा प्रशासन देखील यासाठी राज्य व केंद्र सरकारची आवश्यक तो समन्वय तातडीने साधेल, असे निश्चित यांनी काळे यांना आश्वस्त केले आहे.
दरम्यान, रशिया – युक्रेन मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. युद्ध परिस्थितीमुळे युक्रेनमधील मॉलमध्ये खाद्यपदार्थही मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची मागणी पालकांकडून होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांकडून मायदेशी परत येण्याची धडपड सुरू आहे. काळे यांनी पालकांना चिंता न करण्याचे आवाहन केले असून या कामी शहर काँग्रेसची हेल्पलाईन असणाऱ्या काळे यांच्या ९०२८७२५३६८ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.