मराठा महासंघाचा शिर्डीत सदाशीव लोखंडे यांना पाठिंबा: संभाजी दहातोंडे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झाला निर्णय

अहमदनगर दि. 22 एप्रिल (प्रतिनिधी )ः शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशीव लोखंडे यांना मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजासाठी केलेल्या भरीव कामाबद्दल आज (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे भेटून हा पाठिंबा दिल्या असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचीटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.
संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सरकार म्हणून मराठा समाजासाठी भरीव काम केले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला. सारथीसाठी भरीव निधी दिला. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना शिक्षणासाठी मोठा आर्थिक हातभार लागला आहे. अनेक तरुणांना युपीएससी, एमपीएससी परिक्षेसह अन्य स्पर्धा परिक्षेत अभ्यास करुन यश मिळवता आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून राज्यातील हजारो तरुणांना रोजगारासाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्याचा फायदा होऊन मराठा तरुण उद्योग-व्यवसायाला लागले, रोजगार उपलब्ध झाला. या सर्व बाबीचा विचार करुन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप व पदाधिकाऱ्यांनी राज्यात महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाने शिर्डीतील शिवसेना व महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार सदाशीव लोखंडे यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या विजयासाठी मराठा महासंघाचे कार्यकर्ते काम करतील असे संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.