चांदे खुर्द शाळेचा आगळा वेगळा कार्यक्रम मोफत दंतचिकित्सा व व्याख्याना साठी डॉ.अंजली आबासाहेब सूर्यवंशी यांचा पुढाकार!

चांदे खुर्द (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवार दप्तर मुक्त शाळा या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर अंजली आबासाहेब सूर्यवंशी यांच्या साह्याने मोफत दंतचिकित्सा व दातांची निगा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर अंजली यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची दातांची तपासणी केली व त्यांना आवश्यक त्या औषधांची माहिती दिली. तसेच दातांची निगा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे माहिती सांगितली. दातांची निगा कशी ठेवावी, दात सदृढ राहण्यासाठी आहार कोणता असावा, ब्रश करण्याचे फायदे इत्यादी गोष्टी त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. या कार्यक्रमात इ.३री तील विद्यार्थी प्रद्यूम्न कारंजकर याने डॉक्टर अंजली सूर्यवंशी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये डॉक्टर अंजली सूर्यवंशी यांनी बालपणापासून ते डॉक्टर होईपर्यंत कशाप्रकारे अभ्यास केला, शिक्षकांची व आई-वडिलांची मदत कशाप्रकारे झाली, असे अनेक अनुभव त्यांनी या मुलाखतीतील प्रश्नांच्या उत्तरांमधून दिले.कार्यक्रम समारोप प्रसंगी डॉ.अंजली यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक वर्ग, मातापालक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक दिपक कारंजकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय करून दिला. शेवटी शिक्षक संतोष वायसे सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.