अहमदनगर (प्रतिनिधी दि.५ ऑगस्ट) : नगर शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या राठोड यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिन आहे. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. स्व. अनिलभैय्या यांच्या नसण्याची उणीव समस्त नगरकारांच्या मनाला आजही अस्वस्थ करणारी असल्याचे भावनिक उद्गार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केले आहेत. काँग्रेसच्या वतीने शिवालयात जाऊन काळे यांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
युवा सेना सहसचिव विक्रम राठोड यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, केडगाव काँग्रेसचे किशोर कोतकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी काळे म्हणाले की, नगर शहरातील काँग्रेस ही स्व.अनिलभैय्या यांनी दाखवलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याच्या विचारांवर कायम काम करीत राहील. सर्वसामान्य माणसाने रात्री अपरात्री केव्हाही अनिलभैयांना फोन केला तरी त्यांच्या मदतीला ते तत्परतेने धावून जायचे. आपण फोन केला तर तो फोन उचलला जाईल आणि भैय्या लगेच उपस्थित होतील असा विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये होता.
काळे पुढे म्हणाले, या शहरातील व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाला, फेरीवाला, भाजीवाला अशा कोणत्याही सामान्य घटकाला त्यांनी कधीही त्रास दिला नाही. त्यांनी कायम दहशतीच्या विरोधात संघर्ष करत या शहराला संरक्षण देण्याचे काम केले. स्व.अनिलभैय्या यांच्यामुळे नगर शहरातील सामान्य जनतेची पिळवणूक करणाऱ्या, दहशत करणाऱ्या घटकांवरती मोठा वचक होता. तोच वचक निर्माण करण्याचे काम आज त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. अनिलभैय्या आपल्यात नसण्याची एक पोरकेपणाची भावना नगरकरांच्या मनामध्ये आहे. अनिलभैय्या शरीराने जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार जिवंत राहण्याची गरज आहे. म्हणूनच शहरातील काँग्रेस त्यांच्या विचारांवर काम करीत असून कायम या विचारांची जपणूक करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे यावेळी काळे म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा