पारनेर दि. 29 फेब्रुवारी -( देवदत्त साळवे- तालुका प्रतिनिधी) –
सैनिक बॅंकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करून निवडून आलेल्या पॅनल प्रमुखाने बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांना हाताशी धरून पंचेचाळीस लाख रुपये उचलून अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवडणूकीत वापरलेल्या बॅंकेच्या पैशांचे व्याज वसूल करावे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सहकार खात्याकडे व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली असल्याचे विनायक गोस्वामी यांनी कळवले आहे.तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्यास एक मार्चपासून सैनिक बॅंकेसमोर सभासदांसह उपोषण करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.
पॅनल प्रमुखाने शाखेतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बॅंकेतील पंचेचाळीस लाख रुपये पारनेर शाखा या हेड खाते नावे टाकून निवडणुकीत वापरत असल्याचे लक्षात येताच सहकार खात्याकडे तपासनीचा अर्ज केला होता.त्यानुसार अहमदनगर येथील सहकार खात्याचे पथक तपासणी करत आहेत.सैनिक बॅंकेत अशा प्रकारचा अनागोंदी कारभार मागील अनेक वर्षांपासून सुरू असून याचा भांडाफोड या तपासणीतून होणार असल्याचे विनायक गोस्वामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कर्जत शाखेतील एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये अपहार प्रकरणी आरोपी सदाशिव फरांडे यांना बडतर्फ करावे व कर्जत येथील लेखा परीक्षण अहवालानुसार तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा