अहमदनगर दि. 12 फेब्रुवारी (प्रतिनिधी ): नुकत्याच पुणे येथे निर्भय बनोच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर भ्याड हल्ला केला. हा हल्ला लोकशाही वरील हल्ला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार आहे. लोकशाहीची राजरोसपणे हत्या केली जात आहे, अशी टिका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. चितळे रोड येथे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्याचा निषेध करत जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली आहे.
पुणे भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, वुई सपोर्ट निखिल वागळे, वुई सपोर्ट ॲड. असिम सरोदे, वुई सपोर्ट डॉ. विश्वंभर चौधरी असे फलक यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी झळकवले. यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, साफसफाई कामगार संघटनेचे सचिव विनोद दिवटे, दिव्यांग काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड आदींसह कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले, त्या दिवशी पुण्यात वागळे, सरोदे, चौधरी यांची हत्या करण्याचाच
कट शिजवला गेला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी, विशेषत: युवतींनी त्या ठिकाणी निर्भीड भूमिका घेत रस्त्यावर उतरून सभा पार पडण्यासाठी आंदोलन छेडले. त्याला भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी विरोध केला. असे असले तरी देखील निर्भय होत सभा पार पडली. या त्रिमूर्तींना त्यांच्या निर्भीडते बद्दल आणि निर्भयतेबद्दल त्रिवार सलाम महाराष्ट्र करतो आहे.
सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातून बोलताना वागळे, सरोदे, चौधरी यांनी जाहीर केले आहे की भारतीय जनता पार्टीला त्यांचा विरोध आहे. तसेच महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करत असल्याचे यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले. लवकरच या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये पुढील भूमिका घेत दिशा ठरवीली जाणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.
सावेडी व्यावसायिक हल्ला प्रकरणाचाही केला निषेध :
नगर शहरातील सावेडीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक बन्सी महाराज मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेचा देखील आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत. लवकरच याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून त्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे यावेळी किरण काळे म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा