गटबाजी कराल, तर राजकारणातून घरी बसविणार : आमदार निलेश लंके
जवळा गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

पारनेर दि.१५ जून (प्रतिनिधी ):
विरोधक आपल्यात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. कोणीही उमेदवार असो, तुम्ही पक्षाच्या पाठीशी उभे राहा, गटबाजी करणारांना राजकारणातून घरी बसविण्याचीही ताकत आहे, असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना दिला. जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार नीलेश लंके प्रतिष्ठाण पदाधिकारी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा जवळा शिरूर रस्त्यावरील सिद्धी लॉन्स येथे पार पडला. यावेळी अशोक सावंत अध्यक्षस्थानी होते.
दरम्यान कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिग्गज नेते अनुपस्थित असल्याची चर्चा त्या ठिकाणी सुरू होती.
आमदार लंके म्हणाले, विकास कामांना आपण कुठेही कमी पडणार नाही. सध्या जवळा गटात सुमारे ३७ कोटींची विकास कामे मार्गी लागली आहेत. तर, काही चालू आहेत. आगामी निवडणुकीत कुणीही उमेदवारी मिळाली नाही म्हणून अंतर्गत गटबाजी करू नका. पक्षाच्या व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यावे लागतील, असे ते म्हणाले. यावेळी जवळा गटातील जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारीचे डोहाळे लागलेल्या बऱ्याच इच्छुकांनी मेळाव्यात लवाजम्यासह हजेरी लावली. उमेदवाऱ्या जाहीर होतील, या आशेने उमेदवारीची हळद लावून आलेले इच्छुक मात्र गोंधळात इच्छुक; पडलेले दिसले. उमेदवारी कोणाला हा प्रश्न तसाच भिजत राहिला.