लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनाग्रा यांना प्रदान!

पुणे दि.२० जुलै (प्रतिनिधी)- प्रा. रतनलाल सोनाग्रा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे लेखन विषमता संपवून समतेचा लढाबुलंद आणि प्रस्थापित करण्यासाठी केलेले दिसते. असंख्य रुग्णांनी त्यांचे प्राण वाचल्यानंतर दिलेल्या आशीर्वादाच्या पुण्यसंचयाचा स्पर्श लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्काराला झाल्याने लोककल्याणाचे मंगल कार्य प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या हातून होत राहील असा मला ठाम विश्वास वाटतो, असे प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच आणि रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रतनलाल सोनग्रा यांना यंदाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश बागवे, अॅड. प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड, नगरसेविका लता राजगुरु, राहूल डंबाळे, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, प्रेरणा गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, एकधर्मीय आणि एकदेशीय समाजाचे चित्र आणि चरित्र घडतांना संकुचित नागरित्व विश्वमानवासाठी बाधा बनत आहे. त्यासाठी व्यापक मानवतावादाची पेरणी सर्व क्षेत्रात झाली पाहिजे. अण्णा भाऊंच्या भूमिकेत या प्रक्रीयेची नांदी दिसते. संपूर्ण विश्वाला समतेच्या धाग्याने गुंफणारा हा मराठी कलावंत सर्वांना वंदनीय आहे. लोकमान्य टिळक, शाहीर अमर शेख, उषाताई डांगे, संत ज्ञानेश्वर, यशवंतराव चव्हाण, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोर्की, अशा बहुसांस्कृतिक मानदंडांचा गौरव शाहीर अण्णा भाऊंनी त्यांच्या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत केला. त्यांच्या अर्पण पत्रिकेचा अनुंबध मराठी बहुसांस्कृतिकतेशी जुळला आहे.
यावेळी प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी पुरस्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.