श्रवण यंत्र योजनेसाठी म्हस्के फौंडेशनचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)
कै.दा.र.सुतार गुरुजी यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाप्रती काकासाहेब म्हस्के मेमोरिअल मेडिकल फौंडेशनच्या वतीने १ लाख रुपयांची मुदत ठेव २० वर्षांसाठी बँक ऑफ बडोदा यांच्याकडे ठेऊन त्यातील व्याजातून गरजू ज्येष्ठ वृद्धांना कामगार हॉस्पिटल नागापूर येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी कान, नाक, घसा शिबीर घेऊन व्याजातून कै.दा. र. सुतार गुरुजी श्रवण यंत्र योजना कार्यान्वित करीत असल्याची माहिती फौंडेशनचे विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी दिली.
या मुदत ठेवीचा धनादेश नुकताच कान,नाक, घसा तज्ञ डॉ.अशोक गायकवाड यांच्याकडे संस्थेचे विश्वस्त डॉ.अभितेज म्हस्के यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. यावेळी डॉ.म्हस्के बोलत होते. यावेळी डॉ.अजित फुंदे उपस्थित होते.
डॉ.म्हस्के पुढे म्हणाले की, कै.दा. र.उर्फ दामोदर रघुनाथ सुतार गुरुजी एक सेवाभावी, निस्पृह, आदर्श प्राथमिक शिक्षक होते. चिचोंडी पाटील येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्म घेतलेले सुतार गुरुजी लहानपणी पितृछत्र हरपल्यामुळे विधवा मातोश्री व मामांनी दिलेल्या आधारावर जुनी ७ वी पास होऊन व्हॉलेंटरी शिक्षक म्हणून रुजू झाले. स्वावलंबी, निस्वार्थी व काटकसरी सुतार गुरुजींनी तब्बल २७ वर्षे उक्कडगाव (ता.नगर) येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे सदैव लक्ष दिले. ४ थी व ७ वीच्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थीजनांना नगर येथील माळीवाडा येथील माजी आमदार कि.बा. काका व मातोश्री पार्वतीबाई म्हस्के यांच्या प्रेमळ आधार व संस्कार, आहार इ. सर्व पुरवून आपले कार्य पार पाडीत असतांना कि.बा. काका यांच्या घरातील एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. कै.काकांच्या आमदारकीसाठी स्वखर्चाने गावोगावी समस्त प्रचार करून त्यांना १९६७ व १९७२ या दोन वेळा निवडून आणण्याचे प्राथमिक शिक्षकाचे घट्ट जाळे विणून केलेली सेवा व विधानसभेत काकांचे प्रश्नोत्तरातील तारांकित प्रश्न लिहून काढून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेसाठी आवाज उठविण्यासाठी मदत करणारे सुतार गुरुजी प्राथमिक शिक्षक बँक, गुरुकुल इ.साठी योगदान देत. विद्यार्थ्यांसाठी लेखन, वाचन, वक्तृत्त्व स्पर्धा व त्यातून कै.कि.बा उर्फ काकासाहेब म्हस्के एज्यु. रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्थापन करून मांडवे (ता.नगर) येथे माध्यमिक तर नागापूर, पाईपलाईन रोड, टि.व्ही. सेंटर या शहरातील प्रमुख भागी प्राथमिक व माध्यमिक शाळा उभारून त्यामध्ये कै.काकांचे पश्चात आदर्श विद्यार्थी घडवून आपले योगदान हयातभर केल्याचे ते म्हणाले.